राज्यात नाईट कर्फ्यू आणि विकेंड कर्फ्यू लागू करण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र आणखी आठवडाभरातील परिस्थितीचे अवलोकन करून त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज दिली.
बेंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी नाईट अथवा विकेंड कर्फ्यू लागू करण्याबाबत सध्या प्रस्ताव नसला तरी आगामी ख्रिसमस सण आणि 31 डिसेंबर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कांही उपाय योजना केल्या जातील.
कोरोना प्रादुर्भाव आणि ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सीमावर्ती भागात काटेकोर तपासणी सुरू आहे असे सांगून मात्र सध्या नवा कोणताही निर्णय घेण्याचा सरकारचा विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. सुदर्शन यांनी इशारा देताना कर्फ्यू अथवा लॉकडाऊन टाळावयाचा असेल तर आत्तापासूनच आपण योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. सभा, समारंभ, लोकांची गर्दी होणारे कार्यक्रम, यात्रा, लग्नसराई आदिंना ब्रेक लावला पाहिजे असे सांगून 31 डिसेंबर नववर्ष साजरे करण्यास परवानगी दिली जाऊ नये. तसेच निवडणूक निकाला वेळी गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.