ओमिक्राॅनचा वाढता धोका लक्षात घेऊन संभाव्य परिस्थितीला यशस्वी तोंड देण्यासाठी ओमिक्राॅन मशीन हाताळणारे तंत्रज्ञ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आज बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाप्रसंगी सभागृहात केली.
कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे सुरू असून आज तिसऱ्या दिवशी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी सभागृहांमध्ये राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांच्याकडे उपरोक्त मागणी केली. ओमिक्राॅन मशीन ही कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अविभाज्य अंग बनण्याची शक्यता आहे.
भविष्यात जर ओमिक्राॅन विषाणूचा संसर्ग वाढला तर तो नियंत्रणाखाली आणणे बीम्स हॉस्पिटलला कठीण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण बेळगावच्या सीमेवरील गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील रुग्ण देखील बीम्स हॉस्पिटलवर अवलंबून असतात.
सदर सर्व बाबी ध्यानात घेऊन या हॉस्पिटलसाठी ओमिक्राॅन मशीन हाताळणारे तंत्रज्ञ उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी करून आरोग्यमंत्री डाॅ. के. सुधाकर यांनी एकदा बीम्स हॉस्पिटलला भेट देऊन सर्वांकश परिस्थितीची पाहणी करावी, अशी विनंतीही आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केली.
आमदार ॲड. बेनके यांनी केलेल्या मागणीवरील चर्चेअंती सभापती विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांनी आरोग्यमंत्र्यांनी स्थानिक आमदारांसह बीम्स हॉस्पिटलला भेट देण्याचे मान्य केले असल्यामुळे ते निश्चितपणे हॉस्पिटलला भेट देतील, असे स्पष्ट केले. याबद्दल आमदार ॲड. अनिल बेनके यांनी सभापती आणि आरोग्यमंत्र यांचे आभार मानले.