कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि ओमिक्रॉन व्हेरीएंटचे आढळून आलेले दोन रुग्ण या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज शुक्रवारी नवी मार्गदर्शक सूची जारी केली आहे. त्यानुसार शाळा -कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांवरील बंदीसह माॅल अथवा चित्रपट व नाट्यगृहातील प्रवेशासाठी लसीकरणाचे दोन डोस अनिवार्य असणार आहेत. विमानतळावर कोरोना चांचणी सक्तीची असून ‘नाईट कर्फ्यू’ मात्र सध्या नसणार आहे.
नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयासह राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने जोखमीच्या देशातून येणार्या विदेशी प्रवाशांसाठी स्क्रीनिंग आणि चांचणीचा नियम कठोर केला आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या 28 सप्टेंबर रोजी जारी केलेली मार्गदर्शक सूची 31 डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे. राज्य सरकारने आज जारी केलेली नवी मार्गदर्शक सूची खालील प्रमाणे आहे.
1) चांचणी -शोध -उपचार -लसीकरण आणि कोरोना नियमांचे व्यवस्थित पालन, या पाच सूत्रांची कडक अंमलबजावणी, 2) कार्यक्रम, मेळावे, सभा, बैठका, परिषदा आदींमध्ये कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याबरोबरच सहभागी होणाऱ्यांची संख्या 500 पर्यंत मर्यादित असावी. याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांवर असेल, 3) शैक्षणिक संस्थातील सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अन्य उपक्रम 15 जानेवारी 2022 पर्यंत पुढे ढकलावेत, 4) पालकांनी शाळा कॉलेजमधील आपल्या 18 वर्षाखालील मुलांना सक्तीने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस द्यावेत,
5) आरोग्य कर्मचारी आणि 65 वर्षावरील वृद्ध व्यक्तींची चांचणी अनिवार्य असेल, 6) कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच माॅल, चित्रपटगृह अथवा नाट्यगृहात प्रवेश दिला जावा, 7) सरकारी कर्मचाऱ्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे, 8) खबरदारीचा उपाय म्हणून फेसमास्कचा वापर अनिवार्य असेल, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, 9) बाधित रुग्ण आढळलेल्या भागातील संसर्ग रोखण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सक्रीय निरीक्षण ठेवावे,
10) महाराष्ट्र व केरळ राज्याच्या सीमेवरील चेकपोस्टच्या ठिकाणी आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करून उपाययोजना केल्या जाव्यात. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जावी. राज्यात नाईट कर्फ्यूचा प्रस्ताव तूर्तास नाही.