शहरातील सकाळ – संध्याकाळी फिरावयास जाणाऱ्या नागरिकांकडून केला जाणाऱ्या कचऱ्याची दखल घेऊन शहरातील जागरूक स्वच्छता प्रेमी मॉर्निंग वाॅकर्सनी आज सकाळी रेसकोर्स मैदान येथे श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबवली.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो परिसरानंतर शहरातील गर्द झाडी असलेला रेसकोर्स मैदान परिसर मोठ्या प्रमाणात प्राणवायू अर्थात ऑक्सिजन पुरविणारे शहराचे दुसरे फुप्फुस म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. शुद्ध हवा मोकळे वातावरण असल्यामुळे शहर व नजीकच्या उपनगरातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी फिरावयास येत असतात.
मात्र परत जाताना यापैकी कांहीजण रेसकोर्स मैदान परिसरात खाद्यपदार्थाच्या पिशव्या, पाण्याच्या अथवा शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्या टाकून कचरा करून जातात. त्यामुळे पहाटे सकाळच्या वेळी फिरावयास जाणाऱ्या मॉर्निंग वाॅकर्सना कांही ठिकाणी अस्वच्छतेचा सामना करावा लागतो.
सदर अस्वच्छतेची दखल घेऊन आज सकाळी कांही मॉर्निंग वाॅकर्सनी श्रमदानाने रेसकोर्स मैदानावर स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत मंगल दीपचे प्रवीण खोडा, सरस्वती पेपर्सचे विजय पोरवाल, परशुराम गुरव, शिवाजी धुराजी, निवृत्त न्यायाधीश उल्हास बाळेकुंद्री आदींचा समावेश होता. या सर्वांनी आपल्यापरीने स्वच्छता करून गोळा केलेल्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली.
तसेच रेसकोर्स परिसरात फिरावयास येणार्या लोकांनी कृपया या ठिकाणी केरकचरा करु नये, असे आवाहनही त्यांनी केले. मॉर्निंग वाॅकर्सच्या वरील उपक्रमाबद्दल प्रशंसोद्गार काढले जात आहेत.