शिवप्रेमींच्या भावनांचा उद्रेक झाला तर सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार….छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध….
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शाई फेकून त्याची विटंबना करण्याचा दुर्दैवी प्रकार काल कर्नाटक मधील बंगळुरू शहरात घडला. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. ही घटना अतिशय निंदनीय असून या प्रकरणातील दोषींना शोधून त्यांना कठोरात कठोर शासन करणे गरजेचे आहे.असे मत सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसाचे दैवत नसून तर सकल हिंदुस्थानातील तमाम शिवप्रेमींचे दैवत आहेत. असे असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही घटना क्षुल्लक असल्याचे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपींना त्वरित कठोरात कठोर शासन होणे गरजेचे असून तसे झाले नाही तर त्यांना शिवप्रेमी जनता आपल्या पद्धतीने अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा त्यानी दिलाय.
कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या गुंडांचा आम्ही तीव्र निषेध करतो. म.ए.समिती आणि सर्व शिवप्रेमींच्या मागे महाराष्ट्र सरकार ठामपणे उभे आहे.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 17, 2021
ते म्हणाले की यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांची विटंबना करण्याचे प्रकार सीमावर्ती भागात घडले आहेत. मात्र आमच्या सहनशीलतेला देखील मर्यादा आहेत.
बंगळुरू येथे घडलेल्या घटनेतील आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आल्यास तमाम शिवप्रेमी जनतेचा उद्रेक होईल. तसे झाल्यास त्यास सर्वस्वी कर्नाटक सरकार जबाबदार राहील असेही ते म्हणाले.