एकिकडे शहरानजीकच्या हलगा येथील सुवर्ण विधानसौध येथे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे तर दुसरीकडे शहरातील व्हॅक्सीन डेपो मैदानावर अधिवेशनाला विरोध म्हणून उद्या सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचा मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने आज रविवारी सायंकाळपर्यंत महामेळावा आयोजनास लेखी परवानगी दिली नसती तरी कोणत्याही परिस्थितीत महामेळावा घेऊन आम्ही कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला नेहमीप्रमाणे विरोध दर्शवून असा विश्वास महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतेमंडळींनी व्यक्त केला आहे दरम्यान,
आज सायंकाळी पोलीस प्रशासनाकडून व्हॅक्सीन डेपो मैदान परिसरात प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मैदान परिसरात आतापासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला उद्या सोमवार दि. 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे. मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील नेते मंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे.
त्यामुळे तेथील नेते मंडळी महामेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. कोल्हापुरचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर या मेळाव्यास उपस्थित राहण्याची शक्यता आहे. एकंदर कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याचा ठाम निर्धार केला आहे.