मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे येत्या 13 डिसेंबर रोजी बेळगावात आयोजित केल्या जाणाऱ्या सीमा महामेळाव्याला महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांना आणण्याचे प्रयत्न सुरू झाले असून मंत्री शिंदे यांना मेळाव्यासाठी आणण्याची जबाबदारी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबईचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
सध्या बेळगाव भेटीवर असलेले मुंबईच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी देखील समिती नेत्यांनी त्यांच्यावर सोपविलेली जबाबदारी स्वीकारली आहे. आपण मुंबईला जाताच तातडीने महामेळाव्याबाबतची माहिती समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालून ते मेळाव्याला उपस्थित राहतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन चिवटे यांनी दिले.
बेळगाव शहरातील रामलिंग खिंड गल्लीतील शिवसेनेच्या कार्यालयांमध्ये बोलताना मंगेश चिवटे म्हणाले की, बेळगाववर आपला अधिकार सांगण्यासाठी कर्नाटक सरकारने बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला आहे.
या ठिकाणी सरकारची अधिवेशने घेतली जातात. तसेच दहा-बारा वर्षांपूर्वी कर्नाटक सरकारने बेळगावला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी कर्नाटक सरकार व कन्नड सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र एकिकरण समितीच्या माध्यमातून मराठी भाषिकांनी सीमा महामेळावा आयोजित करण्यास सुरुवात केली.
या महामेळाव्यांना महाराष्ट्र राज्याचे स्वर्गीय उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यासह शिवसेनेचे नेते दिवाकर रावते मंत्री धनंजय मुंढे, जयंत पाटील आदी नेतेमंडळींनी हजेरी लावली आहे. आता पुन्हा कर्नाटक शासन बेळगावात अधिवेशन भरवत आहे. त्यामुळे यावेळीही सीमाभागातील मराठी लोकांचा महामेळावा होत आहे. या मेळाव्याला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा तर आहेत याखेरीज महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वय मंत्री एकनाथ शिंदे हेषदेखील या मेळाव्याला उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न केले जातील असे चिवटे यांनी सांगितले.
मी मुंबईला जाताच तातडीने समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर महामेळाव्याची गोष्ट घालणार आहे. ते महामेळाव्याला उपस्थित राहतील यासाठी मी संपूर्ण प्रयत्न करेन असे सांगून महामेळावा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही मंगेश दिवटे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, विकास कलघटगी दत्ता उघाडे, प्रा आनंद आपटेकर, वाय पी नाईक आदी उपस्थित होते.