बेळगावचे चित्रकार शिरीष देशपांडे यांनी बॉलपेनच्या सहाय्याने रेखाटलेल्या विविध चित्रकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी वरेरकर नाट्य संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये झाले.
सदर उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य, गोव्याचे लेखक -मुलाखतकार डॉ. गोविंद काळे आणि सुप्रसिद्ध सतारवादक संजय देशपांडे उपस्थित होते. प्रारंभी उज्वला देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केल्यानंतर ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमात ‘एक्स्प्लोरिंग द बॉल पॉइंट’ या पुस्तकाचे प्रकाशन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
चित्रकार हा रेषेला रेषा जोडून चित्र तयार करतो असा काहींचा समज आहे. परंतु प्रत्यक्षात चित्रकार आपला जीव ओतून ती कलाकृती जिवंत करण्याचा प्रयत्न करतो. कोणतीही कला ही एका रात्रीत आत्मसात होत नसते.
यासाठी अनेक दिवसांची साधना त्यापाठीमागे असते. चित्रकार शिरीष देशपांडे यांनी बॉलपेनच्या माध्यमातून रेखाटलेली चित्रे हा कलेचा अद्भुत नमुना असल्याचे गौरवोद्गार यावेळी राजेशकुमार मौर्य यांनी काढले. डॉ गोविंद काळे यांनी शिरीष देशपांडे यांच्या कलेमुळे बेळगावला आज एक नवी ओळख मिळाली असून त्यांनी बॉलपेनच्या माध्यमातून साकारलेली चित्रे हा कलेचा परिपाक असल्याचे सांगितले.
टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरी मधील प्रदर्शनामध्ये चित्रकार शिरीष देशपांडे यांच्या 40 हून अधिक अप्रतिम चित्रांचा समावेश आहे. निसर्गचित्र, व्यक्तिचित्र यासह विविध प्रकारांमध्ये ही चित्रे आहेत. सदर प्रदर्शन उद्या 28 डिसेंबरपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.