बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे झालेल्या विटंबनेच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील समस्त मराठा समाज व शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्यावतीने शहापूर छ. शिवाजी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक घालून पूजन करण्यात आले.
शिवाजी महाराज हे ठराविक जाती-धर्माचे नसून सकल भारतीयांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांची विटंबना म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान आहे. मराठ्यांसह समस्त हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान यापुढे कदापि सहन केला जाणार नाही. मराठा समाजासह समस्त हिंदू गप्प बसणार नाहीत, असा इशारा मराठा समाजाचे युवा नेते व भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष किरण जाधव यांनी यावेळी प्रसारमाध्यमांची बोलताना दिला. तसेच येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छ. शिवाजी उद्यानात येऊन शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून नमन करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
महाराजांच्या पुतळा विटंबना निषेधार्थ आमचा संपूर्ण समाज एकवटला आहे. शिवाजी महाराज नसते तर हिंदू धर्मच अस्तित्वात राहिला नसता असे वक्तव्य एका आमदारांनी केल्यानंतर पोटशूळ उठलेल्या समाजकंटक आणि शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली असा आमचा आरोप आहे.
कन्नड ध्वज जाळण्याचा वाद वेगळा आहे. शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे एक प्रकारे समस्त मराठा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत असेही ते म्हणाले. याखेरीज पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ आम्ही काल बेळगावात निषेध आंदोलन छेडले. त्या अनुषंगाने पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, अशी मागणीही जाधव यांनी केली.
बेळगावातील मराठा समाजाचे नेतृत्व करत किरण जाधव आज सकाळी जेंव्हा शिवाजी उद्यान येथे दाखल झाले. त्यावेळी प्रथम पोलिसांनी त्यांना उद्यानात प्रवेश करण्यास आडकाठी केली. यावेळी उभयतांत जोरदार बाचाबाची झाली. अखेर पोलिसांनी नमते घेऊन जाधव यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना उद्यानात प्रवेश दिला.
यावेळी किरण जाधव यांच्या समवेत शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, गुणवंत पाटील, जे. बी. शहापूरकर, रवी निर्मळकर, राष्ट्रीय हिंदू सेनाचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर आदींसह बहुसंख्या मराठा समाज बांधव व शिवप्रेमी उपस्थित होते. उद्यानातील शिवरायांच्या पुतळ्याचे किरण जाधव यांच्या हस्ते दुग्धाभिषेक घालून पूजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव आदी घोषणा देऊन उपस्थित कार्यकर्ते आणि मराठा समाज बांधवांनी उद्यानाचा परिसर दणाणून सोडला होता