पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हिरेबागेवाडी जवळ कन्नड संघटनांनी केलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरून धावणाऱ्या महाराष्ट्र पासिंग वाहनांची हत्तरगी येथेच अडवणूक करण्यात आली.
सुरक्षेच्या मुद्द्यावरून अनेक तास या वाहनांना अडवून ठेवण्यात आले होते. बेंगळूर कडे निघालेल्या वाहनचालकांना या आंदोलनाचा फटका बसला होता.
सोमवारी बेळगाव शहरात आंदोलन करणारच असे जाहीर करून कन्नड संघटनांचे कार्यकर्ते दाखल होत होते. शहरात त्यांच्या प्रवेशास अनुमती न देता त्यांना हिरे बागेवाडी येथेच अडवून आंदोलन करण्याची सूचना देण्यात आली. हे आंदोलन पोलीस बंदोबस्तात बराच काळ चालले होते.
याकाळात महाराष्ट्राकडून येणाऱ्या वाहनांची अडवणूक करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली होती.
कन्नड संघटनांचे आंदोलन संपल्या नंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. बेळगावच्या अनगोळ भागात झालेल्या संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याच्या मोडतोडी विरोधात हे आंदोलन झाले.