गळती लागलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर गेल्या जवळपास 6 वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या रविवार पेठ कलमठ रोड येथील अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या पद्धतीने या रस्त्याचे भाग्य उजळल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील रविवार पेठ परिसरात असलेल्या कलमठ रोड या रस्त्याची पार दुर्दशा झाली होती. गेल्या 6 वर्षापासून हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येऊन देखील त्याची दखल घेतली जात नव्हती. त्याचप्रमाणे अलीकडे या ठिकाणच्या जलवाहिनीला गळती लागून शेकडो लिटर पाणी वाया जात होते. खाच-खळगे पडलेल्या रस्त्यामुळे कलमठ रोड वरून ये -जा करताना वाहनचालकांना विशेषकरून दुचाकी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. शिवाय अपघातही घडत होते.
या प्रकाराला वाचा फोडून बेळगाव लाईव्हने आवाज उठविला होता. त्याची दखल घेऊन काल मंगळवारी प्रथम कलमठ रोड येथील गळती लागलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली.
त्यानंतर लगेचच रातोरात या खराब झालेल्या रस्त्याची डागडुजी करून डांबरीकरण करण्यात आले आहे. कलमठ रोड रस्त्याची दुरुस्ती व डांबरीकरण झाल्यामुळे या भागातील व्यापारी आणि नागरिकांसह वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
*शहरातील ‘या’ रस्त्याला कोणी वाली आहे का?*