विधानपरीषद निवडणूकीत विजयामुळे जारकीहोळी बंधूंचे बेळगाव जिल्ह्यातील राजकीय वजन पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. शिवाय चार सख्खे भाऊ आमदार होण्याची घटना देशात पहिल्यांदाच घडली आहे. जारकीहोळी कुटुंबातील तिघे सध्या विधानसभेचे आमदार आहेत. आता लखन जारकीहोळी हे विधानपरीषद सदस्य झाले आहेत.
२०१९ साली लखन यानी गोकाक मतदारसंघातून विधानसभेची पोटनिवडणूक लढविली होती. बंधू रमेश जारकीहोळी यांच्या विरोधातच त्यानी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी घेतली होती. त्या पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार असलेल्या रमेश यांचा विजय झाला होता. त्यानंतर दीड वर्षांनी झालेल्या बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत लखन व रमेश एकत्र आले होते. या दोहोनी आपलेच बंधू व कॉंग्रेसचे उमेदवार सतीश यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यामुळे सतीश याना पराभव स्विकारावा लागला होता. या अशा परस्पर विरोधी राजकारणामुळेच जारकीहोळी बंधू राज्यात नेहमीच चर्चेत असतात. अशा स्थितीतही जारकीहोळी कुटुंबातील पाच जणांपैकी चौघे आमदार झाले आहेत.
जारकीहोळी सर्वात मोठे रमेश हे गोकाक विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. भालचंद्र हे आरभावी मतदारसंघाचे आमदार आहेत. हे दोघेही भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. सतीश जारकीहोळी हे यमकनमर्डी मतदारसंघाचे कॉंग्रेस पक्षाचे आमदार आहेत. लखन हे मात्र अपक्ष म्हणून विधानपरीषदेवर निवडून गेले आहेत. सख्खे चौघे भाऊ आमदार होण्याचे हे देशातील दुर्मिळ उदाहरण आहे.
मूळचे गोकाक येथील जारकीहोळी बंधूंचा राजकीय प्रवास विलक्षण आहे. १९९९ साली रमेश जारकीहोळी कॉंग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले. २०१९ पर्यंत ते कॉंग्रेस पक्षातच होते व सलग पाचवेळा ते विधानसभेवर निवडून गेले होते. पण २०१९ साली त्यानी कॉंग्रेस पक्षाचा व विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला व भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपकडून पोटनिवडणूक लढविली व ते विजयी झाले. पोटनिवडणूकीत लखन यानी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती, पण आता विधानपरीषदेच्या निवडणूकीत लखन यांच्या विजयात रमेश यांचाच मोठा वाटा आहे.
भालचंद्र व सतीश आधी धर्मनिरपेक्ष जनता दलात होते. भालचंद्र हे विधानसभा सदस्य तर सतीश हे विधानपरीषद सदस्य होते. २००६ साली सतीश यानी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. २००८ साली यमकनमर्डी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली व ते निवडूनही आले. भालचंद्र यानी २००८ साली ऑपरेशन कमळमध्ये जनता दल सोडून भाजप प्रवेश केला. तेंव्हापासून ते भाजपमध्येच आहेत.
राज्यात कॉंग्रेस पक्षाचे सरकार असताना सतीश याना मंत्रीपद मिळाले होते, ते जिल्हा पालकमंत्रीही होते. २००८ साली भाजप सत्तेत असताना भालचंद्र यानाही मंत्रीपद मिळाले होते. रमेश कॉंग्रेसमध्ये असताना व भाजपमध्येही मंत्री झाले होते. पण लखन यांना अपक्ष निवडणूक लढविण्यास सांगून त्याना विधानपरीषदेवर निवडून आणण्यात रमेश यांचाच प्रमुख वाटा आहे.