‘वाचल्यामुळे ज्ञान वाढते तर न वाचल्यामुळे अज्ञान वाढते .चांगली पुस्तके ही आपली गुरू आहेत. पुस्तक वाचनाने माणूस समृद्ध होतो . मच्छ गावात अनंत लाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 48 वर्षांपूर्वी ज्या वाचनालयाचे रोपटे लावले त्याचा आज वटवृक्ष झाला आहे.’ असे विचार राणी चन्नम्मा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख व प्रख्यात लेखक डॉ. विनोद गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केले.
मच्छे येथील सार्वजनिक श्री बाल शिवाजी वाचनालयाच्या स्थापनेला 4 डिसेंबर रोजी 48 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त शनिवारी वाचनालयाचा वर्धापन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून विनोद गायकवाड, पाहुणे म्हणून जायंट्स इंटरनॅशनल चे स्पे. कमिटी सदस्य मोहन कारेकर व पत्रकार अनंत लाड हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष बजरंग धामणेकर व व्यासपीठावर कृष्णा अनगोळकर हे होते. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि मेघा धामणेकर हिच्या मराठा गीताने झाली.
पाहुण्यांचा परिचय करून दिल्यानंतर अध्यक्ष व इतर कार्यकर्त्यांच्या हस्ते पाहुण्यांचा शाल व फुलाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला .अनंत लाड यांनी वाचनालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. आपल्या विनोदी शैलीत डॉ. विनोद गायकवाड यांनी वाचनालयाचे महत्त्व सांगत असतानाच ‘जीवन हे हसण्यासाठी, प्रसन्नतेसाठी जसे आहे तसेच काही तत्त्वांचे पालन करण्यासाठीही आहे.
आपण काही तत्वे घेऊन जगले पाहिजे’ असे सांगितले. ‘शिक्षणामुळे आपण जीवन बदलू शकतो, माणूस कुठल्याकुठे पोहोचू शकतो’ असे सांगून रोज एक पान तरी वाचा आणि जमेल तसे लिहित रहा असा सल्ला त्यांनी दिला. शिक्षकांच्या कर्तव्याबद्दल बोलताना ते म्हणाले की ‘सात खून करणारा खुनी समाजाला परवडतो पण एक पिढी बरबाद करणारा शिक्षक परवडत नाही ‘
याप्रसंगी मोहन कारेकर यांनीही आपल्या भाषणात वाचनालयाला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास मारुती बेळगावकर, पुंडलिक कणबरकर ,गजानन छप्रे, संतोष जैनोजी, केतन चौगुले, रतन गणमकर व इतर अनेक उपस्थित होते. यावेळी अनेक देणगीदारांनी वाचणालयाला रोख रकमेच्या देणग्या दिल्या तर विनोद गायकवाड यांनी पुस्तकांचा संच भेटीदाखल देणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक चौगुले यांनी केले तर आभार अरुण कुंडेकर यांनी मांडले कार्यक्रमास विद्यार्थी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता वाचनालयाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पाहुण्यांनी वाचनालयाची पाहणी करून संचालकांचे कौतुक केले