बेळगाव ते धारवाड हा नियोजित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग देसूर, के.के.कोप्प मार्गे सुपीक पिकाऊ जमिनीमधून उभारण्याचा प्रयत्न झाल्यास या रेल्वेमार्ग प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध राहील आणि वेळ आल्यास त्यासाठी आंदोलन छेडून हा प्रकल्प बंद पाडला जाईल, असा इशारा कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांनी दिला आहे.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारने नव्याने लादलेला नियोजित बेळगाव ते धारवाड हा के. के. कोप्प मार्गे जाणारा रेल्वे मार्ग पूर्णपणे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीमधून जातो. गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, नागेनहट्टी, हलगीमट्टी आदी सात-आठ गावातील शेतकरी या जमिनीमध्ये वर्षातून दोन ते तीन प्रकारची पिके घेत असतो. बेळगाव ते धारवाड या नियोजित रेल्वेमार्गाला आमचा कोणताच विरोध नाही. फक्त तो सुपीक जमिनीतून काढला जाऊ नये. त्याऐवजी खडकाळ पडीक जमिनीचा वापर केला जावा, अशी आमची मागणी आहे. के.के. कोप्प मार्गे जाणाऱ्या नियोजित रेल्वेमार्गाच्या विरोधात या भागातील ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करून ते रेल्वे खाते आणि आमदार-खासदारांना पाठविले आहेत.
याखेरीज दुसऱ्यांदा सर्वेक्षण करून खडकाळ पडीक जमिनीतून हा रेल्वे मार्ग सुचविण्यात आला आहे. दुसऱ्यांदा केलेल्या सर्वेक्षणानुसार हा रेल्वे मार्ग झाल्यास बेळगाव ते धारवाड हे अंतर 3 ते 4 कि. मी.ने कमी होणार आहे. त्यामुळे रेल्वेची इंधनाची बचत होऊन सरकारला कायमस्वरूपी फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या वेळेची बचत होण्याबरोबरच सुपीक जमीन वाचून शेतकर्यांचेही भले होणार आहे. रेल्वेमार्गाचा हा दुसरा प्रस्ताव रेल्वे खात्यालाही मान्य आहे.
तथापि आता खासदार मंगला सुरेश अंगडी यांच्या एका पत्रामुळे हा मार्ग पूर्वीप्रमाणे सुपीक जमिनीतूनच काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. के.के. कोप्प मार्गे बेळगाव -धारवाड रेल्वे मार्ग हे माझ्या नवऱ्याचे स्वप्न होते. तेंव्हा आधीच्या नियोजित योजनेनुसार तो रेल्वे मार्ग साकार झाला पाहिजे, असे खासदार मंगला अंगडी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना बजावल्याचे समजते.
तथापि या पद्धतीने शेतकऱ्यांच्या छातीवर पाय देऊन जर सुपीक जमिनीतून रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, नागेनहट्टी, हलगीमट्टी आदी गावातील समस्त शेतकऱ्यांसह कर्नाटक राज्य रयत संघटनेचा तीव्र विरोध असेल, अशी माहिती देऊन वेळ आल्यास यासाठी मोठा लढा उभारून आम्ही के. के. कोप्प मार्गे नियोजीत बेळगाव ते धारवाड रेल्वेमार्गाचा प्रकल्प बंद पाडू, असा इशारा चुन्नाप्पा पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
याप्रसंगी रयत संघटनेचे नेते प्रकाश नाईक, प्रसाद पाटील आणि राघवेंद्र नाईक यांच्यासह नरेंद्र पाटील, संगाप्पा कुंभार, किरण कोंडे, देवेंद्र पाटील, परशुराम जाधव, मारुती लोकूर, संतोष पाटील, पुंडलिक मेलगे, चेतन पाटील, बसवंत नाईक आदी शेतकरी उपस्थित होते.