कर्नाटक सरकारच्या अत्याचाराचा अतिरेक झाला असून सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही मराठी भाषिकांवर अन्याय केला जात आहे आता निर्वाणीची वेळ आली असून केंद्र सरकारने याबाबत हस्तक्षेप करावा अन्यथा महाराष्ट्र गप्प बसणार नाही, असा इशारा महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम व सीमा प्रश्नाचे समन्वय मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाला काल बुधवारी सुरुवात झाली आहे गुरुवारी अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर कांही वेळातच मंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगाव आणि परिसरातील परिस्थितीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना मंत्री शिंदे म्हणाले, कर्नाटकात मराठी भाषिकांवर दडपशाही वाढत असून कन्नड रक्षण वेदिकेच्या सारख्या संघटना मराठी भाषिकांवर हल्ले करू लागले आहेत. मराठी भाषिकांना त्रास देण्यासाठी गुंडगिरीचा आधार घेण्यास सुरुवात झाली आहे. हिंसक कारवाया केल्या जाऊ लागल्या आहेत. कर्नाटक सरकार हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकण्यात आली, हल्ला करण्यात आला. गेल्या 8 ऑगस्ट 2020 रोजी रात्रीतून मनगुत्ती येथील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला. त्यानंतर आता गेल्या 17 डिसेंबर रोजी बेंगलोर येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. हे प्रकरण कर्नाटक सरकारने गांभीर्याने घेणे गरजेचे होते. मात्र कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ही घटना क्षुल्लक असल्याचे मत व्यक्त केले. यावरून कर्नाटकची मानसिकता दिसून येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करतात. मात्र त्यांचे भाजपचे सरकार असणाऱ्या कर्नाटकात छत्रपतींचा अवमान होतो, हा बेबंदशाहीचा कळस झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे नव्हते अशा प्रवृत्तींना पाठीशी घालता कामा नये.
सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असतानाही सीमाभागात दिवसेंदिवस दडपशाही सुरू असून मराठी कार्यक्रमावर बंदी घातली जात आहे. याबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करून मराठी भाषिकांवर अन्याय दूर व्हावेत यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचे प्रकरण जोपर्यंत न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत सीमाभागातील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवणे गरजेचे आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर अशाच प्रकारे अन्याय वाढत गेले तर महाराष्ट्रालाही विचार करावा लागणार आहे.
‘नाक दाबले तर तोंड उघडते’ त्याप्रमाणे भुमिका घ्यावी लागेल, असा इशाराही मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी कर्नाटक सरकारला दिला. सीमावासीय फक्त शिवसेनेकडे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राकडे येथील सर्व पक्षांकडे अपेक्षेने पाहत आहेत असे सांगून मंत्री एकनाथ शिंदे यांनी बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकार दुर्देवी असल्याचे सांगून त्याचा धिक्कार केला.