कर्नाटक विधिमंडळाच्या निषेधार्थ स्वतःवर झालेल्या हल्ल्याची पर्वा न करता मराठी भाषिकांचा महामेळावा यशस्वी करणारे मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी आज सकाळी शहरातील ज्येष्ठ नेते व समितीचे संस्थापक सदस्य काॅ. कृष्णा मेणसे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
पोलिसांची दडपशाही आणि कन्नड गुंडांनी पोलीस संरक्षणात केलेल्या भ्याड हल्ल्याला भीक न घालता आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी हॅक्सीन डेपो येथील महामेळावा यशस्वी केला. तथापि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची तीव्र पडसाद सीमा भागासह महाराष्ट्रात उमटली.
यासंदर्भात विचारपूस करण्यासाठी शहरातील ज्येष्ठ नेते आणि म. ए. समितीचे संस्थापक सदस्य काॅ. कृष्णा मेणसे यांनी दीपक दळवी यांना दूरध्वनी केला होता. त्यावेळी फोनवर न बोलता मी प्रत्यक्ष येऊन भेटतो असे सांगून दळवी यांनी आज गुरुवारी सकाळी काॅ. मेणसे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
शहरातील सरस्वतीनगर येथील आपल्या निवासस्थानी 94 वर्षीय ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक काॅ. कृष्णा मेणसे यांनी पुष्पगुच्छ देऊन दीपक दळवी यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे दळवी यांच्याकडून महामेळावा आणि त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यासह सीमाप्रश्ना संदर्भातील अलीकडच्या घडामोडी जाणून घेतल्या.
याप्रसंगी काॅ. मेणसे यांचे सुपुत्र कामगार नेते माजी प्राचार्य प्रा. आनंद मेणसे हे देखील उपस्थित होते. यावेळी दीपक दळवी यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेऊन काॅ. कृष्णा मेणसे यांनी त्यांना आशीर्वादासह पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.