विधान परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. कर्नाटक विधान परिषदेच्या दोन जागांसाठी बेळगाव जिल्ह्यात मतदान होत असून या निवडणुकीत नवनिर्वाचित नगरसेवकानी प्रथमच आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांना मतदानाचा हक्क मिळणार की नाही असा संभ्रम होता. मात्र तो संभ्रम दूर झाल्यानंतर सर्वप्रथम नवनिर्वाचित नगरसेवकांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला हक्क बजावला. सकाळी 10 पर्यंत एकूण 58 पैकी 40 हुन अधिक नगरसेवकानी मतदानाचा हक्क बजावला आहे.
महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर गॅझेट नोटिफिकेशन व इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे नगरसेवकांचा मार्ग विधानपरिषद निवडणुकीत सहभागी होण्यासाठी खुला झाला आहे. याच बरोबरीने बेळगाव जिल्ह्यातील आमदारांनीही मतदानाचा हक्क बजावला असून या नंतरच्या टप्प्यात ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अध्यक्ष आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी या निवडणुकीत सहभागी होणार आहेत.
प्राधान्यक्रमाने मतदानाची टक्केवारी मोजून या निवडणुकीतील विजय निश्चित केला जातो. त्यामुळे कोणत्या प्राधान्याची मते कोणत्या उमेदवाराला पडणार? भाजप सरस ठरणार ?काँग्रेस सरस ठरणार?की अपक्ष उमेदवार बाजी मारणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.