कोरोना प्रादुर्भाव काळात विशेष करून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रसंगी केलेल्या कामाचा प्रलंबित पगार अदा करून आम्हाला नोकरीतून कमी करण्यात येऊ नये, अशी कळकळीची मागणी कोरोना प्रादुर्भाव काळात वैद्यकीय सेवा केलेल्या कोरोना वॉरियर्स कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केली आहे.
राज्यातील कोरोनाच्या दुसरा लाटेप्रसंगी वैद्यकीय सेवा केलेल्या बहुसंख्य कोरोना वॉरियर्स वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रादुर्भाव निवळताच सहा -सहा महिन्याचा पगार न देताच कामावरून कमी करण्यात आले आहे. आपल्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविताना या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रलंबित पगार देण्याबरोबरच आपल्याला नोकरीत कायम करावे या मागणीसाठी सुवर्ण विधानसभा येथील आंदोलनस्थळी धरणे धरले आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी जोरदार निदर्शने करून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न चालविला होता.
आपल्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना खानापूर तालुक्यातील कोरोना वॉरियर वैद्यकीय कर्मचारी विनया कार्लेकर म्हणाली की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रसंगी आम्हा जवळपास 70 हून अधिक जणांना तातडीने आरोग्य खात्याच्या वैद्यकीय सेवेत रुजू करून घेण्यात आले. यासाठी प्रारंभी आमच्याकडून 3 महिन्याचे करारपत्र करून घेण्यात आले. त्यानंतर कराराची मुदत वाढवून 6 महिन्याची करण्यात आली.
या सहा महिन्याच्या कालावधीत आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी होऊन रुग्णसेवा करत होतो. दरम्यानच्या काळात आम्हाला दरमहा पगारही मिळाला नाही. तरीही आम्ही कर्तव्य भावनेने काम करतच होतो. मात्र अचानक गेल्या 30 नोव्हेंबर रोजी आम्हाला कामावरून कमी करण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहे. त्याच बरोबर आमचा काम केलेल्या पगार देखील देण्यात आलेला नाही.
नोकरीवरून अचानक कमी केल्यामुळे आम्हा सर्वांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या पद्धतीने आमच्यावर मोठा अन्याय झाला आहे. तरी सरकारने विशेष करून आरोग्य खात्याच्या मंत्र्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच प्रलंबित पगार अदा करून आम्हाला नोकरीतून कमी करू नये, अशी आमची कळकळीची मागणी आहे, असे कार्लेकर हिने सांगितले.