बेळगाव शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढत चालला आहे. सर्वत्र शहारून येईल एवढी थंडी पडत असल्यामुळे सध्या उबदार वस्तूंचा आश्रय घेण्याची वेळ नागरिकांवर आली असून बेळगावचे सध्या महाबळेश्वरच बनले आहे.
19 डिसेंबर रोजी शहरातील तापमानाची नोंद किमान 13.2 अंश सेल्सिअस आणि कमाल 26.6 अंश सेल्सिअस इतकी आढळली आहे. किमान तापमान 13 ते 15 अंशा दरम्यान राहू लागल्याने थंडीची तीव्रता वाढू लागली आहे.
उपनगरी भागात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरात सिमेंटच्या जंगलात थंडीचे प्रमाण कमी असले तरी आजूबाजूला झाडी मध्ये ही थंडी मोठ्या प्रमाणात जाणवू लागली असून त्यामुळे कुडकुडण्याची वेळ सध्या तरी बेळगावकऱ्यांवर आली आहे.