बेळगाव शहरातील 62 दिव्यांग व्यक्तींना नववर्षाची अनोखी भेट मिळणार असून बेळगाव महापालिकेकडून त्यांना तीन चाकी मोपेड दिली जाणार आहे. यासाठी खरेदी करण्यात आलेल्या 62 मोपेड्स सध्या महापालिकेच्या मुख्य कार्यालय आवारात उभ्या आहेत.
मोपेड वितरण योजनेसाठी महापालिका हद्दीतील पात्र दिव्यांगाना अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेकडे दाखल झालेल्या अर्जाची पडताळणी करून त्यातील 62 जणांची या योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 62 मोपेड खरेदी करण्यासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.
ती निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर टीव्हीएस कंपनीकडून महापालिकेला 62 मोपेड्सचा पुरवठाही झाला आहे. सध्या महापालिकेला देण्यात आलेल्या दुचाकी आहेत. त्यांना आणखी एक चाक बसवावे लागणार आहे. शिवाय आवश्यक ते स्पेअर पार्ट्सही त्याला जोडावे लागणार आहेत. याशिवाय प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी देखील करावी लागणार आहे. ही औपचारिकता महापालिकेलाच पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे नव्या वर्षातच या तीन चाकी मोपेड्सचे वितरण होईल, अशी माहिती महापालिका सूत्रांकडून मिळाली आहे.
यापूर्वी माजी नगरसेवका माया कडोलकर आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष असताना दिव्यांगाना तीनचाकीचे वितरण करण्यात आले होते. त्यानंतर निधीची कमतरता व अन्य कांही कारणास्तव ही योजना बंद पडली होती.
तथापि आता निधी उपलब्ध झाल्यावर महापालिकेने पुन्हा ही योजना हाती घेतली आहे. दिव्यांगांसाठी आधी तीन चाकी सायकल दिली जात होती. याशिवाय स्वयंरोजगारासाठी निधीही दिला जात होता. परंतु गेल्या कांही वर्षांपासून तीन चाकी सायकली ऐवजी तीन चाकी मोपेड दिली जात आहे. आता महापालिकेत लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आल्यावरच यामा मोपेड्सचे वितरण होण्याची शक्यता आहे.