देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली असताना देशातील 62 कॅंटोनमेंटमधील रस्त्यांना आजही ब्रिटिश अधिकाऱ्यांची व सैनिकांची नावे असल्याबद्दल खंत व्यक्त करून संबंधित सर्व रस्त्यांना आणि इमारतींना भारतातील शूर सैनिकांची नावे देण्याची घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे.
देशाच्या 96 व्या संरक्षण संपदा दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बोलत होते. सदर समारंभात संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते स्वच्छ कॅन्टोन्मेंट म्हणून नवी दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड, डिजिटल क्षेत्रातील कामगिरीसाठी डिफेन्स इस्टेट ऑफिस, सार्वजनिक सेवेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नैनिताल कँटोन्मेंट बोर्ड तसेच जमीन आणि रेकॉर्ड व्यवस्थापनासाठी संरक्षण इस्टेट पुणे विभाग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या श्रेणीत कसौली कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलमध्ये सुधारणा करण्यासाठी ई -कॅन्टोन्मेंट प्रकल्प राबविण्यासाठी पुरस्कार संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी बोलताना कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील रस्त्यांना ब्रिटिश अधिकारी व सैनिकांच्या नांवांऐवजी देशासाठी योगदान दिलेल्या भारतीय अधिकारी व सैनिकांची नावे देण्याची घोषणा त्यांनी केली. कॅन्टोन्मेंट हद्दीतील नावे बदलण्याचे काम लवकरात लवकर व्हावे, परंतु ज्यांनी प्रशंसनीय आणि भारतासाठी काम केले आहे त्या ब्रिटिश अधिकारी आणि सैनिकांची नांव मात्र ‘जैसे थे’ ठेवावीत, अशी सूचना संरक्षणमंत्र्यांनी केली.
सदर नामकरण करण्याची जबाबदारी संरक्षण खात्याकडे सोपविण्यात आली आहे. सध्या ब्रिटिश कायद्यानुसार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कामकाज चालते. त्यामुळे त्या कायद्यात बदल करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत भारतातील 62 कॅंटोन्मेंट बोर्डांनी 75 जलाशयांच्या पुनर्बांधणीसाठी पुढाकार घेतला आहे. डिफेन्स इस्टेट्स भाडेपट्ट्यांचे नुतनीकरण, इमारतींची पुनर्बांधणी, मालमत्तेची फ्री होल्डमध्ये रुपांतर करण्याशी संबंधित समस्यांवर काम करत आहे.
भारतातील 17.98 लाख एकरात पसरलेल्या संरक्षण खात्याच्या जमिनीच्या सर्वेक्षणात डिफेन्स इस्टेट्सने मोठी झेप घेतली आहे. आता डिफेन्स इस्टेट्स सर्वेक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्याद्वारे अतिक्रमण रोखून संरक्षण भूमीचे संरक्षण करण्यासाठी हद्द निश्चित करण्यात येत आहे.