कागवाड (जि. बेळगाव) तालुक्यातील मोळे गावच्या जगदीश अडहळ्ळी या यूपीएससी परीक्षा 440 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या युवकाची आंध्रप्रदेश केडर आयपीएस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमीमध्ये 11 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जगदीश अडहळ्ळी यांची आता कृष्णा जिल्ह्यामध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक (एएसपी) म्हणून नियुक्ती झाली आहे.
कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या (केपीएससी) 2019 च्या बॅचच्या केएएस परीक्षेत 23 वा क्रमांक मिळविलेल्या जगदीश अडहळ्ळी यांनी यापूर्वी कलबुर्गी येथे प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे.
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्या हजारो तरुणांसाठी जगदीश एक आदर्श ठरले आहेत. कठोर परिश्रम करून परीक्षा देत त्यांनी आपले पालक आणि गावचे नाव तर रोशन केले याचबरोबर बेळगाव जिल्ह्याचे महत्त्व आणखी वाढले आहे.
ग्रामीण भागातून येणारी मुले स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतात. याचे एक उत्तम उदाहरण जगदीश यांनी घालून दिले आहे. कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश साध्य करता येते. हे त्यांच्या यशातून दिसून आले असून आंध्र प्रदेशात आयपीएस अधिकारी म्हणून त्यांनी आपला प्रभाव पाडावा हीच बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक सामान्य नागरिकांची इच्छा आहे.
आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका निभावत असताना जगदीश यांनी आपली छाप आंध्रप्रदेशात पाडावी. आपण केलेल्या कठोर परिश्रम यांचे यश आणि चीज व्हावे अशीच बेळगाव लाईव्ह च्या वतीने त्यांना शुभेच्छा.