Wednesday, January 8, 2025

/

….. या जीवघेण्या रस्त्याकडे कोणी लक्ष देईल का?

 belgaum

बेळगुंदी ते राकसकोप दरम्यानचा अत्यंत खराब रस्ता वाहन चालकांसाठी विशेषकरून दुचाकी वाहन चालकांसाठी दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. त्यामुळे या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करून डांबरीकरण केले जावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

बेळगुंदी ते राकसकोप दरम्यानचा रस्ता गेल्या कांही वर्षापासून अत्यंत खराब झाला आहे. विशेष करून बेळगुंदी ते सोनोलीपर्यंतचा रस्ता हा अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्यावर यापूर्वी अनेक अपघात झाले असून गेल्या मंगळवारी रात्री सोनोली नाल्यानजीक दोघा मोटरसायकल स्वरांची रस्त्यावरील मोठा खड्डा चुकविण्याच्या नादात समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही मोटरसायकलस्वार जखमी झाले.

त्यापैकी हॉस्पिटलमध्ये उपचारांती अभिनंदन ज्योतिबा चव्हाण (वय 28) याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, तर भाऊ नारायण कंग्राळकर (वय 50) या दुसऱ्या मोटरसायकलस्वाराची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाल्यामुळे तो मृत्यूच्या दारात जाऊन पोहोचला आहे. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची स्थिती चिंताजनक असल्याचे समजते. या पद्धतीने यापूर्वी देखील अनेक जण या रस्त्यावरील अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.Road accident  belgundi

सदर रस्त्याच्या दुरुस्तीबाबत गेल्या एक दीड वर्षापासून वारंवार आवाज उठवून देखील अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी अलीकडच्या काळात हा रस्ता अधिकच जीवघेणा ठरू लागला आहे.

याखेरीज रस्त्यावरील खाचखळग्यांमुळे वाहनांचे वारंवार नुकसान होत असल्याने वाहनचालकांना आर्थिक भुर्दंडासह मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करून डांबरीकरण करावे अशी जोरदार मागणी या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांकडून केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.