कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीनजीक बाची ते शिनोळी दरम्यानच्या अत्यंत खराब होऊन धोकादायक बनलेल्या वेंगुर्ला रोड या रस्त्यासंदर्भात बेळगाव लाईव्हने उठलेल्या आवाजाची दखल घेऊन रस्त्याची युद्धपातळीवर डागडुजी करण्यात आल्यामुळे वाहन चालकात समाधान व्यक्त होत आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीनजीक बाची ते शिनोळी दरम्यानचा वेंगुर्ला रस्ता डांबरीकरण उखडून ठिकठिकाणे लहान मोठे खड्डे पडल्यामुळे वाहतुकीस धोकादायक बनला होता. खराब रस्त्यामुळे वाहनचालकांना विशेष करून दुचाकी वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत होती.
त्याचप्रमाणे वाहने नादुरुस्त होत असल्यामुळे मनस्तापही सहन करावा लागत होता. अलीकडे लहान-सहान अपघात घडणाऱ्या या रस्त्यावर शनिवारी उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटून अपघात घडला. याची माहिती मिळताच बेळगाव लाईव्हने सदर खराब रस्त्याबाबत आवाज उठविला होता.
सदर वृत्ताची दखल घेऊन अवघ्या 48 तासात बाची गावादरम्यानच्या वेंगुर्ला रस्त्याच्या दुरुस्तीचे काम संबंधित खात्याने हाती घेतले.
तसेच युद्धपातळीवर रस्त्याची डागडुजी करून रस्ता सुरळीत वाहतूक योग्य बनविला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त होत असून ते बेळगाव लाईव्हला दुवा देत आहेत.