बेळगाव सीमाप्रश्नी लक्ष वेधून घेण्यासाठी कांही युवकांनी ट्विटरवर ‘बेळगाव महाराष्ट्राचे’ हे अभियान चालविले आहे. देशभरातील युवकांनी काल रविवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत ट्वीट करून सीमाप्रश्नी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महाराष्ट्रातील पत्रकारांसह राजकीय नेत्यांनीही ट्विट करत आपण महाराष्ट्र एकीकरण समिती सोबत आहोत हे दाखवून दिले.
बेळगाव बिलोंग्ज टू महाराष्ट्र आणि पुणे येथील ‘आम्ही मराठी बोला चळवळ’ यांनी संयुक्त विद्यमाने ही ट्विटर मोहीम आखली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावरील शाई फेक, बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना व कर्नाटक सरकारच्या अधिवेशनात म. ए. समितीवर बंदी घालण्याच्या सूचनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. अनेक नेतेमंडळींनी कर्नाटक सरकारला इशारा देत हे प्रकार थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत.
संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता वरील प्रमाणे ट्विटर मोहीम आखण्यात आली आहे. युवक मंडळी ट्विटरच्या माध्यमातून आपला आवाज देशासमोर ठेवतात हे लक्षात घेऊन सीमाप्रश्नासाठी ट्विटरचा वापर करण्यात आला आहे.
‘एमएच विथ एमईएस’, ‘बेळगाव महाराष्ट्राचे’, ‘महाराष्ट्र समिती सोबत’ असे हॅशटॅग वापरत ट्विट केले जात होते. महाराष्ट्रातील पत्रकार तसेच अनेक नेतेमंडळींनी ट्विट करत आपण महाराष्ट्र एकीकरण समिती सोबत असून अन्यायाला वाचा फोडण्याचे आश्वासन दिले आहे.