बेंगळुरूमधील सदाशिवनगर पोलिसांनी 17 डिसेंबर रोजी सांके टँकजवळील बश्याम सर्कल येथे छत्रपती शिवाजींच्या पुतळ्याची विटंबना करणार्यांची ओळख पटवण्यासाठी तपासाला गती दिली आहे.
महाराष्ट्रात कन्नड ध्वज जाळल्याच्या प्रत्युत्तरात पुतळ्याला काळे फासण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.या गंभीर प्रकाराची दखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कर्नाटक मराठा वेल्फेअर असोसिएशनने -केएमडब्ल्यूए ने गुन्हा दाखल केला असून या कृत्यामध्ये कोण सामील होते याची चौकशी सुरू आहे, असे पोलीस उपायुक्त मध्य एम.एन. अनुचेथ यांनी सांगितले.
17 डिसेंबरला सकाळी पुतळ्यासमोर लोकांचा जमाव जमला आणि घोषणाबाजी केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून जाण्यापूर्वी त्यांनी पुतळ्यावर शाई फेकली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुतळा स्वच्छ करण्यात आला आणि पुढील कोणतीही घटना घडू नये यासाठी परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
बेळगाव येथील तणावाच्या पार्श्वभूमीवर, कार्यक्षेत्रातील पोलिसांना सतर्कता वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून बेंगळूर शहरातील इतर भागांमध्येही पुतळ्यांना सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे.