बंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल पंतप्रधानांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे, असे स्पष्ट मत महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केले.
बेंगलोर येथे झालेल्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का आहेत? असा प्रश्नही खासदार सावंत यांनी उपस्थित केला आहे. नवी दिल्ली येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत नाहीत, तर ते उभ्या देशाचे आराध्य दैवत आहेत. ज्यांनी या देशाला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला. स्वराज्य निर्माण केले, स्वराज्य निर्माण केले. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना कर्नाटक राज्यात होते. ती विटंबना झाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री बोम्मई ज्या पद्धतीने या घटनेला ‘क्षुल्लक’ असे म्हणतात ही अत्यंत क्लेशदायी, चिड आणणारी, संताप आणणारी गोष्ट आहे.
बेळगावचा सीमाप्रश्न याचा दावा सर्वोच्च न्यायालयात दाखल असतानासुद्धा कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये विधानसौध निर्माण केली आहे. बेळगावचे बेळगावी केले आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ कर्नाटक राज्योत्सव दिनी म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती काळा दिन पाळते. अत्यंत सनदशीर मार्गाने ते त्यांचा निषेध करत असतात. त्या निषेधावेळी समितीच्या दीपक दळवी सारख्या एका ज्येष्ठ नेत्याला पोलीस बाजूला बोलावून नेतात आणि कांही पोरकट पोर पोलिसांसमक्ष दळवी यांच्यावर हल्ला करतात शाई फेकतात. या पद्धतीचे प्रकार बेळगाव सीमाभागातील मराठी जनतेवर कर्नाटक सरकार सातत्याने करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर आमच्याच शिवसैनिकांना मराठी भाषिकांना अटक झालेली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर 307 सारखी कलम लावण्यात आली आहेत. तेंव्हा आता दळवी यांच्यावरील हल्ला आणि महाराजांच्या पुतळा विटंबना याबाबत मी आवाज उठवणार आहे. संसदेच्या शून्य प्रहरात माझा हा विषय लागला आहे. संसद जर व्यवस्थित चालली तर निश्चितपणे मी हा विषय सभागृहात मांडणार आहे.
सभागृहात देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या कर्नाटक सरकारची निर्भत्सना तर करणारच आहे. तसेच मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर कारवाईची मागणीही करणार आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी जनाची नसेल पण मनाची लाज बाळगली पाहिजे. काशी विश्वेश्वराच्या उद्घाटनाप्रसंगी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणाले की जेव्हा औरंजेबासारखे हल्ले होत होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज निर्माण झाले. त्यांनी त्याला प्रतिहल्ल्याने प्रत्युत्तर दिले. अशा शिवरायांचे तुमचे सरकार असलेल्या राज्यात तुमचेच मुख्यमंत्री कमी लेखतात. तेंव्हा तुम्ही गप्प का आहात? त्यांच्यावर कारवाई का करत नाही? असा सवाल मी करणार आहे असे सांगून खरंतर पंतप्रधानांनी बोम्मई यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मागितला पाहिजे, असे खासदार अरविंद सामंत म्हणाले. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी हा सीमावाद गेली 65 वर्षे झाली अद्यापही निकालात निघाला नाही. हा घटनेचा अवमान आहे, असेही खासदार सावंत म्हणाले.