कोणत्याही एका धर्माच्या विरोधात धर्मांतर बंदी कायदा नसून कोणत्याही धर्माला त्रास देण्यासाठी तो नाही. धर्मांतरामुळे उडपीमध्ये दोन तर मंगळूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळेच हा कायदा आणत आहोत, असे गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र यांनी सांगितले.
गुरुवारी बेळगावातील सुवर्णसौधमध्ये विधीमंडळ अधिवेशनात विधानसभेत धर्मांतर बंदी विधेयकावरील चर्चेत सहभागी होऊन ते बोलत होते. गृहमंत्री ज्ञानेन्द्र म्हणाले, स्वच्छेने केल्या जाणाऱ्या धर्मांतराला या कायद्यात कसलीच आडकाठी नाही. मात्र त्यासाठी 30 दिवस आधी जिल्हाधिकार्यांना माहिती देणे सक्तीचे आहे. आमिष दाखवून जबरदस्तीने धर्मांतर केल्याचे सिद्ध झाल्यास शिक्षेची तरतूद आहे. त्याचप्रमाणे सामूहिक धर्मांतरासाठी ही 3 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
दरम्यान, धर्मांतर बंदी विधेयक पाडणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी माफी मागावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी सुवर्ण विधानसौध येथे गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली. येडियुरप्पा म्हणाले, ज्या पद्धतीने शिवकुमार यांनी धर्मांतर विरोधी विधेयकाची प्रत फाडून टाकली. त्याच पद्धतीने देशात जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. आम्ही अल्पसंख्यांकाच्या विरोधात नाही. परंतु काँग्रेसने अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करू नये. आपल्या कृतीबद्दल शिवकुमार यांनी सभागृहात माफी मागावी, असे येडियुरप्पा यांनी सांगितले. तसे धर्मांतर बंदी विधेयक मांडण्यात येईल ते सर्वानुमते मंजूर करावे असे आवाहन त्यांनी केले.
महसूल मंत्री आर. अशोक यांनी धर्मांतर बंदी कायद्यात केवळ काही सुधारणाही केल्या आहेत. जनतेच्या हिताच्या दृष्टीने हा कायदा सरकार आणत असल्याचे सांगितले. पत्रकारांशी बोलताना मंत्री अशोक यांनी धर्मांतर बंदी कायद्याचे समर्थन केले ते म्हणाले, दुप्पटी पणामुळे काँग्रेसचा देशात सर्वत्र उपवास होत आहे. राज्य आणि देश एकसंध रहावा यासाठी धर्मांतर बंदी कायदा लागू झाला आहे. जे -जे, ज्या -ज्या धर्मात आहे त्यांनी त्यांच्या धर्मात राहावे. आपली पूजाउपासना सुरु ठेवावी. एका धर्माला दुसर्या धर्मात जाणे चुकीचे आहे, असे मंत्री अशोक म्हणाले. या कायद्याला ‘खाई त्याला खवखवे’ या म्हणीप्रमाणे कांहीजण विरोध करत आहेत. तुमचे कोण धर्मांतर करत आहे का? जे विरोध करत आहेत त्यांना आम्ही कधीही आमच्या धर्मात या असे म्हंटलेले नाही. आमचा धर्म टिकून राहावा. दुसरे धर्म टिकून राहावेत हेच भाजपचे धोरण आहे, असेही अशोक यांनी स्पष्ट केले.
सिद्धरामय्या यांना आम्ही जेंव्हा सगळे साक्षीपुरावे दाखवले त्या वेळी ते भांबावून निघून गेले. काँग्रेस नेते रस्त्यावर एक आणि विधानसौधमध्ये एक बोलतात त्यांचे धोरण तेच आहे, असे मंत्री अशोक यांनी सांगितले. एकंदर नव्या धर्मांतर बंदी कायद्याने कोणत्याही धर्माचे नुकसान होणार नाही अशी ग्वाही ही मंत्री आर. अशोक यांनी यावेळी दिली
दरम्यान, राज्यात धर्मांतर बंदी कायदा आणण्याच्या सरकारच्या निर्णयाचे श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी स्वागत केले आहे. हुबळी येथे पत्रकार परिषदेत बोलताना सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक म्हणाले, या कायद्यामुळे बेकायदेशीरपणे आमिष दाखवून किंवा जबरदस्तीने केल्या जाणाऱ्या धर्मांतराला आळा बसेल. या कामी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी श्रीराम सेना टास्कफोर्स स्थापन करणार आहे. दहा जणांचे हे टास्क फोर्स कायदा हातात न घेता कार्य करेल. गोहत्याबंदी कायदा आणला असला तरी प्रभावी अंमलबजावणीसाठी हा कायदा कागदावरच असल्याची टीका मुतालिक यांनी केली.
त्याचप्रमाणे 31 डिसेंबरला नववर्षाच्या स्वागताची ही आपली परंपरा नाही. त्यामुळे श्रीराम सेना त्याचा निषेध करते. गुढीपाडवा हा हिंदुधर्माचा नववर्षारंभ आहे. त्यामुळे 31 डिसेंबरला नववर्ष स्वागताचा निर्णय घेतलेल्या इस्कॉन, धर्मस्थळ आणि रविशंकर गुरुजीना ते करू नये यासाठी पत्र लिहिले आहे, जर त्यांनी तसे केल्यास त्याविरोधात श्रीराम सेना आंदोलन करेल, असा इशारा देऊन हिंदू धार्मिक स्थळात नववर्ष स्वागत करू नये, असे मुतालिक यांनी सांगितले. यावेळी श्रीराम सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.