हालगा बेळगावची सुकन्या होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिची वेटलिफ्टिंगमधील विजयी घोडदौड सुरूच असून गुंटूर (तेलंगणा) येथे काल गुरुवारी पार पडलेल्या अखिल भारतीय पातळीवरील आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक हस्तगत केले आहे.
गुंटूर (तेलंगणा) येथे काल पार पडलेल्या अखिल भारतीय पातळीवरील आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेमधील महिलांच्या 87 किलो वजनी गटात बेळगावच्या अक्षता कामती हिचा सहभाग होता. या गटामध्ये लव्हली युनिव्हर्सिटी पंजाबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षतासह देशातील विविध विद्यापीठांचे 23 स्पर्धक होते. या सर्वांमध्ये सरस कामगिरी नोंदविताना अक्षता हिने स्नॅच अँड क्लीन जर्कमध्ये सर्वाधिक वजन उचलून प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले.
भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे (साई) जवाहरलाल नेहरु स्टेडियम नवी दिल्ली येथे गेल्या नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अक्षता कामती हिला भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा खात्याचे मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उत्कृष्ट ॲथलीटसाठी असणारा राष्ट्रीय स्तरावरील’संस्थात्मक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
अक्षता कामती ही गेल्या 2017 सालापासून राष्ट्रीयस्तरावरील महिलांची कनिष्ठ व वरिष्ठ वेटलिफ्टिंग स्पर्धा आणि खेलो इंडियामध्ये वेटलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी नोंदवत आहे. याखेरीज अन्य स्पर्धांमध्ये देखील भरीव कामगिरी नोंदविली आहे. अक्षता हिचा ‘स्नॅच अँड क्लीन जर्क’ या प्रकारात हातखंडा आहे.
अक्षताचे दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण हालगा येथील शारदा गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले असून हरियाणा येथे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केल्यानंतर सध्या ती पंजाब येथील लव्हली युनिव्हर्सिटीमध्ये बीएचा अभ्यासक्रम शिकत आहे. अक्षता ही दिवसातून सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा तीन वेळी एकूण जवळपास 6 तास वेटलिफ्टिंगचा सराव करते. तिला प्रशिक्षक वीरूपाल यांचे मार्गदर्शन आणि आई वडिलांचे प्रोत्साहन लाभत आहे. उपरोक्त यशाबद्दल अक्षता कामती हिचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.