बेळगाव शहरी आणि ग्रामीण योजना सहाय्यक संचालकांच्या बेळगाव आणि निप्पाणी येथील कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी आज छापा टाकून चौकशी व कागदपत्र तपासणी सुरू केली आहे.
भू परिवर्तन आणि ले-आउट संदर्भातील प्रकरणे लवकरात लवकर निकालात न काढणे आणि नागरिकांकडून पैशाची अतिरिक्त मागणी करणे. याबाबतच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन उपरोक्त छाप्याची कारवाई करण्यात आली. शहरी आणि ग्रामीण योजना सहाय्यक संचालकांच्या सुवर्ण विधानसौध येथे असणाऱ्या बेळगाव विभागीय कार्यालय व्याप्तीत बेळगाव ग्रामीण, खानापूर, बैलहोंगल, रामदुर्ग आणि सौंदत्ती तालुक्याचा अंतर्भाव आहे.
त्याचप्रमाणे निप्पाणी येथील चिक्कोडी विभागीय कार्यालय व्याप्तीत अथणी, चिक्कोडी, हुक्केरी, रायबाग आणि गोकाक तालुक्याचा अंतर्भाव आहे. बेळगाव आणि निपाणी येथील कार्यालयाच्या विरोधात तक्रारी वाढल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी आज बुधवारी या कार्यालयांवर छापा टाकून चौकशी आणि कागदपत्र तपासणी सुरू केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे (उत्तर विभाग) पोलीस अधीक्षक बी. एस. नेमगौड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक करुणाकर शेट्टी आणि मंजुनाथ गंगल यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक अडीवेश गुडीगोप्प, सुनीलकुमार, अली शेख आणि परमेश कवटगी यांच्यासह 20 हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचा उपरोक्त कारवाईत सहभाग होता.