22 व्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर हैदराबादच्या माजी सैनिकांतर्फे आज शहरांमध्ये 50 वा ‘हिली डे’ उत्साहात साजरा करण्यात आला.
कॅम्प येथील गोगटे रंगमंदिराच्या सभागृहात या हिली डे समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडीयर सुरेश मूर्ती, कर्नल एस. जी. शिंदे, करणारी एस. एस. हेरवाडकर, ब्रिगेडियर एस. जी. इलगोवन, मेजर नानावली, सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन दिलावर मुलानी, सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन संभाजी भिसूरकर, नायक यल्लापा येळ्ळूरकर, गीता हडकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने समारंभाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी आपले जवान जीवाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र सीमारेषेवर सज्ज असतात त्यांचे हे कार्य राष्ट्राच्या विकासाला मोठा हातभार लावणारे आहे. एकंदर सैन्यात दाखल होणाऱ्या प्रत्येक सैनिकाचे देशाच्या प्रगतीतील योगदान महत्त्वाचे आहे असे विचार व्यक्त केले.
हिली डे समारंभाचे औचित्य साधून याप्रसंगी सेवा निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांसह 1971च्या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नींचा आणि युद्धामध्ये सहभागी झालेल्या जवानांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. समारंभास 22 व्या एमएलआरसी हैदराबादच्या माजी सैनिकांसह त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.