बेळगाव शहरासह आसपासच्या ग्रामीण भागाला काल रविवारी सायंकाळी झोडपलेल्या पावसामुळे पिकांना फटका बसला असून येळ्ळूर शिवारातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच भात मळणीवर पावसाने पाणी फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.
बेळगाव शहरासह ग्रामीण भागात काल रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. सुगी हंगामाला प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांची धांदल सुरू आहे. येळ्ळूर शिवारात कापणी केलेल्या कांही भात पिकांमध्ये रविवारी पावसाचे पाणी साचल्यामुळे भात पिकाचे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे कापणी झालेल्या शिवारात पाणी साचल्यामुळे भात पीक काळे पडण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
भात मळण्या या सर्वसामान्यपणे रात्रीच्या वेळी होतात. रस्त्याशेजारील गाद्यांमधील भात पिकाची तर थेट मळणीच घातली जाते. पावसाचा अंदाज आल्यामुळे काल येळ्ळूर शिवारातील रस्त्याकडेला गादे असलेल्या शेतकऱ्यांनी दिवसाउजेडी मळणी उरकण्याचा बेत आखला होता.
शिवारातील रस्त्यालगत गादे असणाऱ्या एका शेतकऱ्याने 2 एकरची भात मळणी घातली होती. मात्र पावसामुळे मळणी अर्धवट राहिली आणि भात व गवत पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले.
याच पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी रस्त्याशेजारी घातलेल्या मळण्या काल पावसाने भिजून गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.