महाराष्ट्र राज्य येळ्ळूर फलक प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत अडकलेल्या युवकांचा त्रास संपता संपेना अशीच परिस्थिती आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी आता 20 जानेवारीला गेली असल्यामुळे न्यायालयात वारंवार भेट देण्याची वेळ या तरुणांवर आली आहे.
या प्रकरणात अनेक तरुण अकारण गोवले गेले असल्याने त्यांना न्यायालयीन खेटा माराव्या लागत आहेत. न्याय मिळणार या अपेक्षेने हे तरुण न्यायालयीन प्रक्रियेकडे लक्ष ठेऊन आहेत.
2015 पासून सलग सात वर्षे तारीख पे तारीख असाच अनुभव या तरुणांना घ्यावा लागत आहेत. 2015 साली माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी अर्ज केल्यावरून हा फलक काढण्यात आला. गावातील काही नागरिकांनी तो पुन्हा बसवला. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करून मारहाण केली व युवकांवर गुन्हे दाखल केले.
सलग सात वर्षे यासंदर्भातील सुनावणी न्यायालयात सुरू असून लवकरात लवकर न्याय मिळावा. अशी मागणी हे तरूण करत आहेत.
दरवेळी तारीख मिळाल्यामुळे व पोलीस व इतर प्रशासनाकडून न्यायालयीन प्रक्रियेत पूर्ण सहकार्य केले जात नसल्यामुळे सुनावणी पुढे-पुढे ढकलत आहे. न्यायालयाने संबंधित गोष्टीची दखल घेऊन न्याय द्यावा. लवकरात लवकर या प्रकरणातील सर्व निर्दोष तरुणांची सुटका व्हावी. अशी मागणी होत आहे.