वक्फ बोर्डाकडून आनंदवाडी येथील 45 घरांचा ताबा उद्या गुरुवारी घेतला जाणार असून या कारवाईसाठी बोर्डाने पोलीस बंदोबस्त पुरवण्याची विनंती पोलीस आयुक्त डाॅ. के. त्यागराजन यांच्याकडे केली आहे. मात्र वक्फ बोर्डाच्या या कारवाईला विरोध करण्याचा निर्णय आनंदवाडी येथील रहिवाशांनी घेतला आहे.
आनंदवाडी येथील जागेवर 1913 ला वक्फ बोर्डाकडून मालकी हक्काचा दावा करण्यात आला होता. तेथील संपूर्ण जमीन ही शेरखान जुम्मा मस्जिद तथा वक्फ बोर्डाच्या मालकीच्या असल्याचा दावा देखील केला गेला होता. त्यावेळी वक्फ बोर्डाकडून आनंदवाडी येथील रहिवाशांना नोटीस पाठवून संबंधित जागा रिकामी करण्यास सांगितले होते. तथापी त्या नोटिशीच्या विरोधात नागरिकांचा न्यायालयीन लढा अद्यापही सुरू आहे. तेथील जागेचा मालकी हक्काची कागदपत्रे रहिवाशांकडे आहेत, तरीही पब्लिक प्रिमायसीस ॲक्टच्या नांवाखाली वक्फ बोर्डाने तेथील रहिवाशांच्या विरोधात स्वतः याचिका दाखल केली. वक्फ बोर्डाच्या बेंगलोर येथील न्यायालयात यावर सुनावणी होऊन 45 घरांची जागा ताब्यात घेण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. मात्र या दाव्याशी संबंधित नोटीस 45 घरमालकांना पाठवण्यात आलेली नाही. त्याच्या अपरोक्ष सुनावणी घेऊन निर्णय दिला गेला आहे.
दरम्यान, घराचा ताबा घेण्याच्या कारवाईवेळी बंदोबस्त पुरवण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी टिळकवाडी पोलिसांना दिली आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी पोलिस बंदोबस्तात बोर्डाकडून तेथे कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे. तथापि केवळ 45 घरांचे मालकच नव्हे तर संपूर्ण आनंदवाडीतील रहिवाशांकडून या कारवाईला विरोध केला जाणार आहे.
कारवाईबाबतची कोणतीही माहिती संबंधित घरमालकांना दिलेली नाही. थेट पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस आयुक्तांना अर्ज दिला आहे. टिळकवाडी पोलिसांच्या माध्यमातून आनंदवाडी येथील रहिवाशांना याबाबतची माहिती मिळाली आहे. आनंदवाडी येथील जागेचा वाद दिवाणी न्यायालयात प्रलंबित असताना वक्फ बोर्डाकडून थेट कारवाई कशी केली जाऊ शकते? असा प्रश्न स्थानिक रहिवाशांना पडला आहे.