बेळगाव -खानापूर महामार्गावर असलेल्या मैलांच्या दगडावरील गावांच्या मराठी नांवांमधील शुद्धलेखनाच्या चुका अखेर चांगल्या दुरुस्त करण्यात आल्या असून ‘झाडशहापूर’ आणि ‘वाघवडे’ ही गावांची नांवे व्यवस्थित झळकल्याने मराठी भाषिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव -खानापूर महामार्गावर झाडशहापूर ते मच्छे दरम्यान उभारण्यात आलेल्या मैलाच्या दगडावर गांवाच्या मराठीतील नांवाची मोडतोड करून झाडशहापूरचे नांव ‘जदसाठापूर’ आणि वाघवडे ऐवजी ‘दागवादे’ असे चुकीचे लिहिण्यात आले होते.
नांवांच्या अशुद्ध लेखनामुळे वाचणाऱ्यांना त्यातून कोणताही अर्थबोध होत नव्हता. चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आलेल्या या मराठी नांवाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी संतप्त मराठीभाषिकातून करण्यात आली होती.
माजी जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी देखील यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराला जाब विचारला होता. परिणामी कंत्राटदाराने चूक मान्य करून दुरुस्ती करताना पुन्हा चुकीची पुनरावृत्ती केली होती.
दुसऱ्यांदा चूक करताना झाडशहापूर गावाचे नांव ‘झाडथापूर’ असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार जाणून बुजून तर केला जात नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र रमेश गोरल यांनी पुन्हा पाठपुरावा केल्यामुळे आता मैलाच्या दगडावरील ‘एनएच -748 /झाडशहापूर’ आणि ‘एनएच -748 /वाघवडे’ अशी गावांची नांवे व्यवस्थित झळकली आहेत. यामुळे संबंधित गावातील गावकऱ्यांसह या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या मराठी भाषिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.