बेळगाव जिल्ह्यातून काँग्रेसतर्फे विधान परिषदेसाठी पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी मागितली होती. परंतु नवीन चेहर्यांना संधी देण्यासाठी ही निवडणूक आता लढवणार नसल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगून आगामी लोकसभा किंवा राज्यसभेत लोकप्रतिनिधीत्व करण्यासाठी मी इच्छुक असल्याचे कळविणार आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील, असा विश्वास माजी मंत्री व केपीसीसीचे उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांनी व्यक्त केला.
निपाणी येथे काल शुक्रवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मी काँग्रेसकडे विधानसभा आणि विधान परिषदे करता सात वेळा उमेदवारी मागितली व पक्षाने विश्वास ठेवून उमेदवारी दिली. दोन्ही सभागृहात 28 वर्षे काम केले आहे. या वेळी विधान परिषदेकरिता इच्छुक म्हणून पक्षश्रेष्ठींकडे अर्ज दाखल केला होता. परंतु आपण होऊन नवीन चेहर्यांना संधी देण्यासाठी आता मी माघार घेतली आहे.
त्याऐवजी लोकसभा अथवा राज्यसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. याकरिता राज्याचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मल्लिकार्जून खर्गे, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्याकडे विनंती केली आहे, असेही वीरकुमार पाटील यांनी स्पष्ट केले.
मी राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास इच्छुक आहे. त्यानुसार पक्षश्रेष्ठी आपल्या इच्छेचा जरूर विचार करतील. पक्षाने संधी दिल्यास या भागाच्या विकासास हातभार लावण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस माजी आमदार काकासाहेब पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम आदी उपस्थित होते.