गेल्या कांही दिवसांपासून 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पुढील महिन्यात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होऊ शकते का? याची चाचपणी केली जात आहे. तथापि पुढील महिन्यात म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत लसीकरणाचे 100 टक्के उद्दिष्ट गाठण्याची तयारी आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याने केली आहे. त्या दृष्टीने नियोजनही करण्यात आले आहे.
बेळगावातील जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी लसीचा मानवी चांचणी करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सुमारे 20 पेक्षा अधिक मुलांवर मानवी चांचणी करून त्यांचे निरीक्षण नोंदविले जात आहे. लस पुरवठा कंपनी आणि सरकारमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार डिसेंबरमध्ये लस मिळण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोसासाठी पुढील महिन्यात 100 टक्के उद्दिष्ट गाठण्याची तयारी आरोग्य खात्याने सुरू केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 45 लाख 51 हजार जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली असून यापैकी 31 लाख जणांनी पहिला डोस घेतला आहे तर 13 लाख जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
यामुळे दुसऱ्या डोसासाठी सुमारे 18 लाख नागरिक प्रतीक्षेत असून त्यांना डिसेंबर अखेरपर्यंत लस देण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, कांही तज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली असली तरी त्याचे ठोस पुरावे नाहीत. मात्र संभाव्य तिसरीला लाटेला थोपवण्यासाठी आरोग्य विभागाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि केरळ राज्यातून येणाऱ्या आरटी -पीसीआर चांचणी सक्तीचे करण्यात आली आहे.