माजी महापौर शिवाजी सुंठकर यांची घरवापसी होऊन ते पुन्हा समितीमध्ये परतले असून त्यामुळे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटामध्ये आज यशस्वी एकी झाली. परिणामी महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला असणाऱ्या बेळगाव तालुक्यातील समस्त कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांमध्ये पुनश्च एकवार नव्या जोषासह उत्साह आणि आनंदाचे वारे वाहू लागले आहेत.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटामध्ये एकी करण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज गुरुवारी दुपारी ओरिएंटल शाळेनजीकच्या तुकाराम महाराज ट्रस्ट हॉलमध्ये पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी हे होते. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, तालुका समितीचे अध्यक्ष निंगोजी हुद्दार कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर उपाध्यक्ष ॲड एम.जी. पाटील खजिनदार एस. एल. चौगुले युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक जि. पं. सदस्य सरस्वती पाटील मनोज पावशे ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर म्हात्रू झंगरूचे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकणाऱ्या माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी समितीच्या दोन्ही गटातील एकीसाठी आजच्या बैठकीला आवर्जून हजेरी लावताना साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. दीपक दळवी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केल्यानंतर सुंठकर यांनी व्यासपीठावरील प्रत्येकाशी हस्तांदोलन करून आनंद व्यक्त केला.
यावेळी बोलताना दीपक दळवी म्हणाले की, तालुक्यातील समितीमध्ये जी फूट पडली होती त्याची खंत अनेकांना वाटत वाटत होती. शिवाजी सुंठकर गटाला पुन्हा समितीत सामावून घेण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले, पण कुठे जुळत नव्हते. मात्र आज सारी संभ्रमावस्था संपली आहे. आजचा आनंद कशा पद्धतीने साजरा करावा समजत नाही. आजच्या कार्तिक पौर्णिमेचा हा प्रसादच म्हणावा लागेल असे सांगून आज प्रत्येक महालक्ष्मी पूजेच्या ठिकाणी आपण आपल्या लढ्याला यश मिळू दे अशी प्रार्थना करुया असे दळवी म्हणाले.
आज ज्या तऱ्हेने तुम्ही सर्वजण एकत्र आलात. त्यामुळे यापुढे ग्रामीण भागातील मराठी माणूस धाडसाने बोलू शकतो. कारण मी कांहीतरी बोललो तर कोणाला कांही तरी वाटेल, गैरसमज होईल ही यापूर्वी वाटणारी भीती अदृश्य भावना आता दूर झाली आहे. पूर्वी मोकळेपणाने कोणी बोलत नव्हते. सतत दडपण असायचे. मात्र ही दबावाची जाणीव आज संपली आहे. तरुणांनी आणि नेत्यांनी एकीचा हा जो प्रयोग केला आहे, त्याला चांगले फळ आले आहे. यामुळे यापुढे कोणीही दुखावला जाणार नाही असे सांगून प्रत्येक निवडणुकीतील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तसेच सर्वोच्च न्यायालयातील दाव्या संदर्भात समिती वकिलांना आवश्यक माहिती पुरवण्याची आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडत असून दडपशाहीला सामोरे जाण्यास आपण कचरत नाही. प्रश्न आहे स्वतःची संस्कृती, मायबोली आणि स्वाभिमानाचा. समितीमध्ये हा जो अंगार आहे तो कार्यकर्त्यांनी प्रज्वलित केला आहे, असेही दीपक दळवी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना तालुका युवा समितीचे अध्यक्ष संतोष मंडलिक म्हणाली की, आज दोन्ही गटात झालेली ही एकी पदासाठी झालेले नाही. भगवा झेंडा आणि आपल्या माय मराठीची शान अबाधित राखून सीमाप्रश्न सुटावा, हे एकच सर्वांचे ध्येय आहे. यासाठी आता आपण सर्वांनी संघटित होऊन काम करावयाचे आहे निवडणूक लढविणे हा लढ्याचा एक भाग आहे. समिती निवडणुकीसाठी नाहीतर सीमा प्रश्नासाठी आहे. तेंव्हा या पुढे निवडणुकीवरून कोणतेही मतभेद होणार नाहीत याची दक्षता वरिष्ठांनी घेतली पाहिजे आणि आता ते होऊ दिले जाणार नाही असे सांगून आजच्या एकीमुळे मराठी माणसाचा 15 वर्षांचा वनवास संपला आहे असे मंडलिक म्हणाले.
बैठकीत प्रथम समितीच्या दिवंगत पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या श्रद्धांजलीचा ठराव संमत करण्यात आला. त्यानंतर दोन्ही समित्या एकत्र करण्याचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न आज यशस्वी झाला आहे आणि या पुढील जे कार्य असेल ते संघटितपणे केले जाईल, असा ठराव बैठकीत टाळ्यांच्या गजरात सर्वानुमते संमत करण्यात आला.
तसेच रिंग रोड आणि मच्छे -हालगा बायपासच्या विरोधातील लढ्यात तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील, हा तिसरा ठराव संमत करण्यात आला. आजच्या या बैठकीस तालुक्यातील समितीचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेर दत्ता उघाडे यांनी सर्वांचे आभार मानले