बेळगाव शहरातील शिवबसवनगर येथे अलीकडेच स्मार्ट सिटीच्या रस्त्यावर पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्शाने एका कुत्र्याचा मृत्यू झाला. आता कोल्हापूर सर्कल येथे स्मार्ट पथदीपाच्या खांबामधील थेट बाहेर डोकावणारी जिवंत विद्युत तार मृत्यूचा सापळा बनू पहात आहे.
शिवबसवनगर येथील केपीटीसीएल समुदाय भवनानजीकच्या स्मार्ट सिटी डबल रोडवर खुल्यावर पडलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने अलीकडे एका जर्मन शेफर्ड कुत्र्याचा बळी गेला होता.
या घटनेनंतर अद्यापही बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे अधिकारी शहाणे झालेले दिसत नाहीत. कारण देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे कोल्हापूर सर्कल येथील रस्त्याशेजारी असलेल्या स्मार्ट पथदीपांचा एक खांब सध्या धोकादायक बनला आहे.
सदर खांबामधील विजेच्या सर्किट बॉक्सचे झाकण गायब झाले असून आतील एक जिवंत विद्युत तार थेट बाहेर डोकावत आहे.
हि तार सदर खांबाजवळून ये -जा करणाऱ्या पादचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरण्याची शक्यता आहे. तेंव्हा एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता स्मार्ट सिटीच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि दुरुस्ती करून संबंधित तार व्यवस्थित आत घालावी. तसेच पथदीपाच्या सर्किट बॉक्सला झाकण बसवावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.