बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक चुकीच्या पद्धतीने झाली आहे अशी तक्रार गेल्या 18 सप्टेंबर रोजी प्रभाग क्र. 50 च्या उमेदवार गीता मनोहर हलगेकर यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.
बेळगाव महापालिकेची निवडणूक व्हीव्हीपॅट मशीन शिवाय घेण्यात आली असल्याची तक्रार करण्यात आली असून त्या तक्रारीची माहिती व स्पष्टीकरण तक्रारदारांना द्यावे अशी सुचना राज्य निवडणूक आयोगाने आपल्या पत्राद्वारे बेळगाव जिल्हाधिकार्यांना केली आहे.
गीता मनोहर हलगेकर या प्रभाग क्रमांक 50 मधून उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होत्या. त्यांच्यासह अनेक जणांनी व्हीव्हीपॅट मशीन शिवाय निवडणूक घेण्यात आली असल्याची तक्रार केली होती.
त्याची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतल्यामुळे निवडणूक रिंगणातील पराभुत उमेदवारांसह मतदारांमध्ये देखील समाधान व्यक्त होत आहे.