बेळगावसह सीमाभागातील मराठीचे अस्तित्व पुसून टाकण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या कर्नाटक प्रशासनाने मराठी भाषकांची गळचेपी चालवली आहे. बेळगाव -खानापूर महामार्गावर झाडशहापूर ते मच्छे दरम्यान उभारण्यात आलेल्या मैलाच्या दगडावर गांवाच्या मराठीतील नांवाची मोडतोड केली आहे.
वाचणाऱ्यांना त्यातून कोणताही अर्थबोध होत नाही. चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आलेल्या या मराठी नांवाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी मराठीभाषिकातून होत आहे.
बेळगाव -खानापूर महामार्गाचे कामकाज सुरू असून कांही भागात काम संपले आहे. त्याठिकाणी रस्त्याच्या बाजूला मैलाचे दगड उभारण्यात येत असून त्यावर परिसरातील गावांची नांवे कन्नड बरोबरच मराठीतूनही देण्यात येत आहेत. मात्र यामध्ये मराठी अक्षरे चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात येत असल्यामुळे वाचणाऱ्यांना कोणताही अर्थबोध होत नाही. बेळगाव -खानापूर महामार्गावरील झाड शहापूर गावाचे नांव कन्नडमध्ये बरोबर लिहिण्यात आले आहे.
मराठी मध्ये मात्र झाडशहापूरचे नांव विचित्र पद्धतीने देण्यात आले आहे. झाड शहापूरचे नाव ‘जदसाठापूर’ असे कोणत्याही अर्थबोध न होणाऱ्या पद्धतीने लिहिण्यात आले आहे. वाघमोडे गावाच्या नांवामध्येही मोडतोड केलेली आहे. विशेष म्हणजे सर्व गावांची नावे कन्नडमध्ये बरोबर देण्यात आलेली आहेत. मात्र मराठीमध्ये चुका करण्यात आल्या आहेत. वाघवडे ऐवजी ‘दागवादे’ असे लिहिण्यात आले आहे. मराठी गावांची मराठी भाषेतील नावे चुकीची अर्थहीन लिहिल्यामुळे मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे गावाच्या नावांमध्ये चुकीची अक्षरे लिहून मराठी भाषेचा जाणून-बुजून अवमान करण्यात आला असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, झाड शहापूर गावचे माजी जि. पं. सदस्य रमेश गोरले यांनी यासंदर्भात बेळगाव -खानापूर महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंत्राटदाराशी संपर्क साधून मैलाच्या दगडावर चुकीची मराठी अक्षरे लिहून गावांची अर्थहीन नावे लिहिल्याबद्दल जाब विचारला. तेंव्हा कंत्राटदाराने आपली चूक झाल्याचे मान्य करून क्षमा मागितली आहे. तसेच तात्काळ एक-दोन दिवसात अक्षरांची दुरुस्ती करून गावांची नांवे व्यवस्थित लिहिली जातील, असे स्पष्ट केले आहे.