स्मार्ट सीटीच्या कामामुळे बेळगावात चार हुन अधिक माणसाचे बळी गेलेत तर शेकडो जण जखमी झालेत अश्या घटना आपण वर्तमान पत्रात माध्यमातून वाचल्या आहेत. स्मार्ट सिटीच्या कामाचा फटका केवळ माणसानाचं नव्हे तर मुक्या प्राण्यांनाही बसला आहे.
बेळगाव शहरातील केपीटीसीएल समुदाय भवन नजीकच्या स्मार्ट रस्त्यावरील स्मार्ट सिटी पथदिव्यांच्या खुल्या जिवंत विद्युत तारेमुळे एका कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल शुक्रवारी रात्री घडली.
केपीटीसीएल समुदाय भवन नजीकच्या स्मार्ट रस्त्यावरून जाणाऱ्या एका कुत्र्याला काल शुक्रवारी रात्री पथदीपाच्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाला. परिणामी विजेचा जबर धक्का बसून तो कुत्रा रस्त्यावर जागीच गतप्राण झाला. याबाबतची माहिती मिळताच कुत्र्याच्या मालकाने घटनास्थळी धाव घेऊन तीव्र संताप व्यक्त केला.
केपीटीसीएल समुदाय भवनानजीकचा हा दुपदरी रस्ता बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बांधलेला पहिला रस्ता आहे. या रस्त्यावर पहाटे 5 वाजल्यापासून सकाळी फिरावयास जाणाऱ्या लोकांची ये-जा असते. कुत्र्याच्या मृत्यूमुळे सदर रस्त्यावरील जिवंत विद्युत तारेची कल्पना सर्वांना आली, अन्यथा हा प्रकार नागरिकांच्या जीवावर बेतू शकला असता.
तेंव्हा बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आतातरी आपले डोळे उघडावेत आणि योजनेचे काम चांगल्या जबाबदारीने चांगल्या पद्धतीने केले जाईल याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.