बेळगाव पोलीस आयुक्तालय व्याप्तीतील विविध गुन्हेगारी प्रकरणांचा छडा लावून बेळगाव शहर पोलिसांनी जप्त केलेला 1 कोटी 51 लाख रुपयांचा मुद्देमाल ‘प्रॉपर्टी परेड’द्वारे आज गुरुवारी संबंधित 55 मालकांकडे सुखरूप परत करण्यात आला. या मुद्देमालामध्ये रोख रकमेसह सोन्याचांदीचे दागिने, 3 कारगाड्या आणि 91 मोटरसायकलींचा समावेश आहे.
बेळगाव पोलीस आयुक्तालय व्यक्तीमध्ये गेल्या 2019 ते 2021 या कालावधीत घडलेल्या चोरी स्नॅचिंग वगैरे गुन्हे प्रकरणांचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या अधिकार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी तपास लावण्यात आला तसेच आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
हा मुद्देमाल संबंधित मालकांना परत करण्यासाठी आज गुरुवारी पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी ‘प्रॉपर्टी परेड’चे आयोजन करण्यात आले होते. या परेडमध्ये चोरट्यांकडून ताब्यात घेतलेला मुद्देमाल मांडण्यात आला होता.
सदर मुद्देमालामध्ये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 12 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 3 कार गाड्या आणि 26 लाख 10 हजार 500 रुपये किंमतीच्या 91 मोटरसायकलींचा समावेश होता. या मुद्देमालापैकी 13 लाख 90 हजार 640 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एपीएमसी पोलिसांनी जप्त केले आहेत. त्याचप्रमाणे मारुती पोलिसांनी 23 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तर बेळगाव ग्रामीण पोलीस आणि 5 लाख 69 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे आणि 41 हजार 400 रुपये किमतीचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
याखेरीज उद्यमबाग पोलिसांनी 3 लाख 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. प्रॉपर्टी परेडमध्ये बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या हस्ते जप्त केलेला मुद्देमाल उपस्थित संबंधित 55 मालकांकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी पोलीस उपायुक्त डाॅ. विक्रम आमटे यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते.