ती नवे कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय फार पूर्वीच घ्यावयास हवा होता. तथापि कांहीही असो आता हे कायदे मागे घेण्यात आले असून हा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसह सर्वांचाच ऐतिहासिक विजय आहे, असे मत केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असणारे तीन नवे कृषी कायदे केंद्र सरकारने मागे घेतले आहेत. यासंदर्भात बेळगाव येथे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. पंतप्रधानांनी नवे कृषी कायदे मागे घेतले हे एक मोठे आश्चर्यच आहे.
अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नमते घेऊन लोकांच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आदर करावा लागला. यासाठी ऊन, पाऊस आणि थंडीची तमा न बाळगता जवळपास एक वर्ष आंदोलन करून शेतकऱ्यांनी देखील मोठा त्याग केला आहे. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आदी भागातील शेतकऱ्यांनी खूपच प्रदीर्घ लढा दिला आहे.
हा जनतेचा देखील ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल. खरेतर संबंधित कायदे मागे घेण्याचा निर्णय यापूर्वीच सुरुवातीलाच घ्यावयास हवा होता. तेंव्हा हा निर्णय घेतला असता तर पंतप्रधानांबाबतचा आदर वाढला असता, असे आमदार सतीश जारकीहोळी पुढे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या या विजयाने मला आनंद झाला आहे. काँग्रेस पक्षासह भाजप वगळता अन्य पक्षांनी देखील शेतकऱ्यांना पाठिंबा देताना तीनही कृषी कायद्यांना विरोध केला होता. देशातील बुद्धीजीवींनी देखील पाठिंबा देऊन विरोध केला होता. या सर्वांचाच हा विजय आहे असे मी मानतो.
देशात मोठ्या प्रमाणात शेतकरीवर्ग आहे. त्यामुळे भावी निवडणुका नजरेसमोर ठेवून कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला असावा. कांहीही असो हा शेतकऱ्यांसह सर्वांचाच ऐतिहासिक विजय आहे, असे आमदार जारकीहोळी शेवटी म्हणाले.