विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या गेल्या मंगळवारी शेवटच्या दिवशी समर्थकांच्या गर्दीमुळे शहरातील सरदार्स मैदान व सीपीएड मैदाना कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी उठविलेल्या आवाजाची दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी मैदानांच्या स्वच्छतेचा आदेश दिल्यामुळे कचरा काढून मैदाने स्वच्छ करण्यात आली आहेत.
विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी गेल्या मंगळवारी आलेल्या विविध उमेदवारांच्या समर्थकांनी आपली वाहने सरदार्स आणि सीपीएड मैदानावर पार्क केली होती. मैदानावर जमलेल्या समर्थकांच्या गर्दीमुळे दोन्ही मैदानांना कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
सर्वत्र चहाचे कप, पाण्याच्या बाटल्या, पत्रावळी, निवडणुकीची पत्रके विखरून पडली होती. हा कचरा मैदानात सलग दोन दिवस पडून होता. त्यामुळे दुर्गंधीसह अस्वच्छतेमुळे मैदानाला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. कचऱ्यामुळे खेळाडूंना सराव करणे ही कठीण झाले होते.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हसह अन्य प्रसारमाध्यमं आणि वृत्तपत्रांनी आवाज उठवला होता. त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी मैदानाची स्वच्छता करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मैदानाची स्वच्छता केल्यामुळे दोन दिवसानंतर या मैदानांनी मोकळा श्वास घेतला आहे.