समर्थनगर येथील शेतवाडीतून राष्ट्रीय महामार्गपर्यंत रस्ता व्हावा, यासाठी गेल्या कांही वर्षापासून शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आल्याची चिन्हे दिसू लागली असून काल शुक्रवारी स्वतः आमदार ॲड. अनिल बेनके यांनी यासंदर्भात पाहणी केली.
समर्थनगर येथील शेतवाडीतून राष्ट्रीय महामार्गपर्यंत जाणारा रस्ता व्हावा अशी अनेकांची मागणी आहे. या रस्त्यासाठी गेल्या कांही वर्षापासून शेतकरी संघटना पाठपुरावा करीत आहे.
आता त्याला यश आले असून शुक्रवारी बेळगाव उत्तरचे ॲड. आमदार अनिल बेनके यांनी समर्थनगर शेतवाडीतून जाणाऱ्या रस्त्याची पाहणी केली आणि लवकरच रस्ता तयार केला जाईल असे आश्वासन दिले. आमदार बेनके यांना सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थित या रस्तासंदर्भात माहिती देण्यात आली.
यावेळी सर्वप्रथम हा रस्ता कच्च्या स्वरूपात केला जाईल. त्यानंतर डांबरीकरण करून पक्का करण्यात येईल, असे आश्वासन आमदार बेनके यांनी दिले.
पावसाळ्यात समर्थनगर शेतवाडीतून राष्ट्रीय महामार्गापर्यंत ये -जा करणे शेतकऱ्यांना कठीण जात होते. चिखलातून शेतकऱ्यांना गवताचे भारे सायकलीवरून घेऊन जाणे अवघड बनत होते. आता हा रस्ता झाल्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सुटणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.