मुसळधार पावसामुळे बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील हजारो एकर भात व ऊस पिकाचे नुकसान झाले असून शासनाने सर्वेक्षण करून संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचे निवेदन खानापूर तालुक्यातील शेतकर्यांच्यावतीने भाजप महिला मोर्चाच्या ग्रामांतर जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज शनिवारी सकाळी डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेले निवेदन जिल्हाधिकारी व्यंकटेशकुमार यांनी स्वीकारून योग्य ती कार्यवाही करण्याबरोबरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. गेल्या कांही दिवसातील मुसळधार पावसामुळे बेळगावसह खानापूर तालुक्यातील भात व ऊस पीक नष्ट झाले आहे.
यामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून त्यामुळे काल नंदगड येथील(ता. खानापूर) एका शेतकऱ्याने आत्महत्येचाही प्रयत्न केला. याची गांभीर्याने दखल घेऊन भाजप महिला मोर्चाच्या ग्रामांतर जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांनी आज तातडीने शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्याबरोबरच त्यांनी निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांच्या नावे देखील धाडली आहे.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत यांनी अतिवृष्टीमुळे खानापूर तालुक्यातील भात व ऊस पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली असून त्यांनी आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे असेही त्यांनी सांगितले. संतोष कुकडोळी या शेतकऱ्याने कक्केरीसह अन्य गावांच्या परिसरातील शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती पत्रकारांना दिली.
गेल्या आठ दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे हजारो एकर जमिनीतील भात व अन्य पिके नष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी केली. निवेदन सादर करतेवेळी खानापूर तालुक्यातील कककेरी, इटगी, पारिशवाड आदी गावातील शेतकऱ्यांसह भाजप कार्यकर्ते ईश्वर सानीकोप, बसवराज कडेमनी, बाळेश व चावन्नावर रुद्रगौडा पाटील हे उपस्थित होते.