विधान परिषद निवडणुकीमध्ये आपल्या नातलगांना ढकलण्याचा आमदारांचा कल सातत्याने अखंड सुरूच आहे. उत्तर कर्नाटकामध्ये तर सोमवारी हा प्रकार जणू सार्वत्रिक झाला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार संघासाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये बीदरमधील भीमनगौडा पाटील, रायचूरमधील शरणेगौडा बय्यापूर आणि बेळगावमधील चन्नराज हट्टीहोळी यांचा समावेश आहे.
भीमनगौडा हे राजकीय घराण्यातील प्रभावशाली हुमनाबाद पाटील यांचे तिसरे बंधू आहेत. या घराण्याचे प्रमुख बसवराज पाटील हुमनाबाद हे एस. एम. कृष्णा यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. भीमनगौडा यांचे ज्येष्ठ बंधू राजशेखर पाटील आमदार असून अन्य एक बंधू चंद्रशेखर पाटील हे विधान परिषद सदस्य आहेत. शरणेगौडा बय्यापूर यांचे काका रायचूर जिल्ह्यातील कुष्टगीचे आमदार आहेत.
चन्नराज हट्टीहोळी हे काँग्रेस आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे कनिष्ठ बंधू आहेत. त्यांना आणि त्यांच्या भगिनीला ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी आमदार वीरकुमार पाटील आणि माजी विधान परिषद सदस्य विवेकराव पाटील यांच्यावर कुरघोडी करून पक्ष नेतृत्वाकडून निवडणुकीचे तिकीट मिळवण्यात यश आले आहे.
एकंदर उत्तर कर्नाटकमधील जिल्ह्यांमध्ये राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या घराण्यातील सदस्यांचा आमदारांच्या दोन्ही सभागृहातील जागा हस्तगत करण्याकडे वाढता कल आहे. त्याचप्रमाणे राजकीय वर्णपटलावर याबाबतीत भाजप पेक्षा काँग्रेस मंडळी मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहेत. भाजपने उमेदवारी डावलल्या नंतर जारकीहोळी बंधूमधील सर्वात कनिष्ठ असलेले लखन जारकीहोळी आज मंगळवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे राजकारणात उतरणारे गोकाक बंधूंमधील ते चौथी ठरले आहेत. त्यांचे बंधु आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी पक्षाची दुसरी उमेदवारी लखन जारकीहोळी यांना देण्याची मागणी केली होती. मोठे बंधू रमेश जारकीहोळी यांनी आपल्या लहान भावाला तिकीट न मिळाल्याची बाब गांभीर्याने घेतली नसली तरी तेही लखन जारकीहोळी यांना तिकीट मिळावे या मताचे होते.
गेल्या पोटनिवडणुकीमध्ये गुलबर्गा उत्तर मतदारसंघातून पराभूत झालेले भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील हे भाजपचे विधान परिषद सदस्य बी. जी. पाटील यांचे चिरंजीव आहेत. धारवाड जिल्ह्याचे विधानपरिषद सदस्य प्रदीप शेट्टर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांचे कनिष्ठ बंधू आहेत. बागलकोटचे विधान परिषद सदस्य हनुमंत निराणी हे भाजप नेते व मंत्री मुरुगेश निराणी यांचे कनिष्ठ बंधू आहेत. विजापूरातील काँग्रेसचे विधान परिषद सदस्य सुनीलगौडा पाटील हे काँग्रेस आमदार व माजी मंत्री एम. बी. पाटील यांचे बंधू आहेत.
या पद्धतीने आपल्या प्रभावाचा वापर करून आपल्या नातलगांना सभागृहात आणण्याचा सर्वच आमदारांचा जो कल आहे तो अतिशय धोकादायक असून त्याला विरोध झाला पाहिजे. कारण त्यामुळे राज्यसभा अर्थात वरिष्ठ सभागृहाचे पावित्र्य नष्ट होऊ शकते, असे मत निजद नेते अश्फाक अहमद मदकी यांनी व्यक्त केले आहे. नेतेमंडळी आपली मुलंबाळं आणि नातलगांना आपले राजकीय वारसदार समजत असतील. परंतु अशा घराण्यातील क्वचितच कोणीतरी उत्तम नेता बनू शकतो. त्यामुळे राज्याच्या आणि पक्षाच्या हितासाठी राजकीय घराणेशाहीला प्रोत्साहन देणे बंद झाले पाहिजे, असेही मडकी यांनी स्पष्ट केले. दरम्यान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या पक्षाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. माझ्या भावाला तिकीट मिळाले यात कांही नवल नाही. कारण काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तळागाळात जाऊन तो राबत आहे. त्याला पाठिंबा द्यावा अशी विनंती आम्ही पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींकडे केली होती आणि त्यांनी एकमताने त्याच्या नांवाला पाठिंबा दिला आहे, असे आमदार हेब्बाळकर यांनी म्हटलं आहे.