पोलीस खात्याचीही आता पूर्णपणे कानडीकरण करण्यात आले असून यापूर्वी इंग्रजी भाषेत घेण्यात येणारी कवायत अर्थात पोलीस परेड यापुढे फक्त कानडी भाषेतूनच घेण्यात यावी, असा फतवा राज्य शासनाने नुकताच काढला आहे. विशेषकरून सीमावर्ती भागातील बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे आदेशात म्हंटले आहे.
बेळगाव जिल्ह्यासह राज्यात दिवसेंदिवस कानडीकरण्याचा वरवंटा फिरवला जात आहे. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कन्नड भाषेतूनच व्यवहार केले जावेत, यासह कन्नडला प्रथम प्राधान्य देण्यासाठी सरकारची धडपड सुरु आहे. प्रशासनाचा कारभार कन्नड भाषेतूनच चालला पाहिजे यासाठी सातत्याने खटाटोप केले जात आहेत.
बेळगावचे तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बी. आर. रविकांतेगौडा यांनी इंग्रजी भाषेतील पोलीस कवायतीचा कानडी भाषेत अनुवाद केला होता. तसेच कर्नाटकात कन्नड भाषेमध्ये पोलिस कवायत घेण्यात यावी असा प्रस्ताव गृह खात्याकडे पाठविला होता.
पोलीस कवायतीमध्ये 80 ते 90 टक्के पोलीस सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांना कन्नड भाषेतील कवायतीचे अंगवळण पडावे यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रायोगिक तत्त्वावर पोलिसांची कन्नड भाषेत परेड घेण्यात येत होती.
त्यानंतर आता 1 नोव्हेंबरपासून विशेष करून सीमावर्ती भागातील बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटकात केवळ कन्नड भाषेतूनच पोलीस परेड घेण्यात यावी, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. एकंदर या पद्धतीने पोलीस खात्याचे देखील आता पूर्णपणे कानडीकरण झाले आहे.