सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अपार्टमेंट, व्यवसायिक आस्थापणे, हॉटेल्स, धाबे तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या 2 हजार जणांना पोलिस खात्याच्यावतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिस जारी करताच तब्बल 26 हजार कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
बेळगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून सातत्याने खबरदारी घेतली जात आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतलेल्यांवर कारवाई केली जात आहे. मटका तसेच जुगार अड्ड्यांवर सातत्याने धाड सत्र अवलंबिले जात आहे. तसेच गुंडा कायद्याअंतर्गत देखील कारवाईचे अस्त्र यापूर्वी उगारण्यात आले आहे.
अलीकडे शहर उपनगर आणि ग्रामीण भागातील 100 हून अधिक लॉजमध्ये पोलिसांनी एकाच वेळी तपासणी केली. कांही सराईत गुन्हेगार सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणी आपला डाव साधत आहेत. त्यामुळे तशा प्रकरणांचा तपास करण्यात पोलिसांना अवघड जात आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रोज 100 ते 500 हून अधिक लोकांची ये-जा असते अशा गर्दीच्या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशा नोटिसा पोलिस खात्याकडून 2000 आस्थापनांच्या मालकांना बजावण्यात आल्या होत्या.
नोटिसा जारी करण्यापूर्वी केवळ 8 हजार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. नोटिसा पाठविण्यात आल्यानंतर 26,000 नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. एकंदरीत पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराज यांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. सार्वजनिक सुरक्षा कायद्यानुसार दिवसात 100 किंवा 500 लोकांचा वावर असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे असल्याचे कायद्या सांगतो.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे. कॅमेरे न बसविलेल्या 2000 हून अधिक जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला असून मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी स्पष्ट केले आहे.